पुरंदर ! विजय लकडे ! 'पुस्तक समाजाचे मस्तक'...... या विचाराने तरुणाईला आत्मनिर्भर करणारी निरेतील जनार्दनभाऊ फरांदे अभ्यासिका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-- ---
नीरा : विजय लकडे
ज्योत से ज्योत जगाते चलो....
 प्रेम की गंगा बहाते चलो...
श्री. संत ज्ञानेश्वर, एका घरात ज्ञानाचा दिवा लावून ते घर उजळले तर अनेक घरे उजळतील... महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, शिका संघटित व्हा संघर्ष करा.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी खरा प्रगतीचा मार्ग ओळखून फार पूर्वी शिक्षणाचे महत्व ओळखून सर्व समाज साक्षर करण्याचा प्रयत्न केला. 
                या संत महात्म्यांच्या विचाराने भारावून जाऊन आजच्या विज्ञान व स्पर्धेच्या युगात सर्व समाजाला शिक्षणाची व त्याद्वारे मिळालेल्या ज्ञानाची नितांत गरज आहे. ज्या समाजामुळे आपण आज आर्थिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहोत त्या समाजाचे उतराई होण्यासाठी आपणही योगदान दिले पाहिजे. ज्ञानज्योतीने ज्योत पेटवा ती चिरकाल टिकेल. ज्ञानसाधकाला ज्ञान मिळवण्यासाठी आधाराची व योग्य मार्गदर्शनाची गरज आहे . हे ओळखून श्री. दिलीप फरांदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागातील ज्ञानाचा स्पर्धक विद्यार्थी शहरातील ज्ञानप्राप्तीच्या सर्व सुविधा मिळालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धेत टिकला पाहिजे हे ओळखून निरा, ता. पुरंदर, जि. पुणे  येथे कै.जनार्दनभाऊ फरांदे, अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र २०१८ यावर्षी सुरू केले. या अभ्यासिकेला व मार्गदर्शन केंद्राला आज ५ वर्ष पूर्ण होत आहेत.
          ग्रामीण भागातील अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या शेतकऱ्याची मुले व मुली यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी व मार्गदर्शनासाठी दिल्ली, मुंबई व पुणे येथे परवडणारे नाही. त्यामुळे स्पर्धकांची ओढ व पसंती निरा येथील कै. जनार्दनभाऊ फरांदे अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राकडे आहे. शहरातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलींच्या बाबतीत काही अघटीत घटना घडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे अभ्यास करणाऱ्या स्पर्धक मुलींच्या बाबतीत आत्मबल वाढवण्यl बरोबर मुलींची विशेष काळजी घेतली जाते.  यामुळे पालकांनाही कोणतीही चिंता राहत नाही. येथे मुलींना सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातात. पैसा कमावण्यापेक्षा स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवून गुणवत्ता वाढवली जाते. होतकरू विद्यार्थ्यांना तर सक्षमपणे आत्मनिर्भर पणे उभे राहण्यासाठी विशेष हातभार लावला जातो. ग्रामीण भागातील बागायती क्षेत्रातील मुले आई-वडिलांना आधार देण्यापेक्षा आई-वडिलांचा आधार घेत असतात परंतु जिरायत  क्षेत्रातील स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थिनींना फाटक्या तुटक्या जीवनमानाची जाणीव असल्याने कै. जनार्दनभाऊ फरांदे अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या मदतीने आपल्या आई-वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी नेत्र दीपक कामगिरी करताना दिसून येतात.
 केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सर्व शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेश परीक्षा (जे. ई. ई., नीट, सि. ई. टी., एन. डी. ए.,), संरक्षण क्षेत्र, कृषी, बँकिंग, महसूल, पोलीस , सार्वजनिक बांधकाम ,पाटबंधारे इत्यादी क्षेत्रातील ज्ञानसाधक व स्पर्धकांनी कै. जनार्दनभाऊ फरांदे अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या मदतीने आपला ठसा उमटवून सर्वोच्च शिखर गाठले आहे व गाठत आहेत. हे अभिमानास्पद आहे.
        सध्या राजकारणातले अनेक धुरंदर आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आपला झेंडा धरणाऱ्या तरुणांचे साठी व जनतेवर पकड राहावी म्हणून अनेक निरर्थक गोष्टीवर वायाला जाणारा व निरुपयोगी खर्च करीत असताना श्री. दिलीप फरांदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केलेली कै. जनार्दनभाऊ फरांदे अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे ग्रामीण भागातील ज्ञानप्राप्ती व रोजगाराच्या स्पर्धेत असलेल्या सर्व स्पर्धकांना प्रेरणादायी व योग्य मार्गावर नेणारे ठरत आहे.
 
To Top