सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी
येथील शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार करून आरोग्यसेवा देण्यात आली.
गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवली जाते. सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांचे जनरल चेकअप ; रक्तदाब तपासणी ; जखमी रुग्णाची मलमपट्टी करण्यात आली तर ज्या वारकऱ्यांमध्ये ताप ; सर्दी ; खोकला ; उलटी ; जुलाब ; चक्कर येणे ; थकवा / अशक्तपणा जाणवणे अशा रुग्णांना लक्षणानुसार औषधोपचार करण्यात आले. सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली. आरोग्यसेवेच्या माध्यमातून ईश्वरसेवा करण्याचा शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचा हा सातत्याने करत असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
सदर आरोग्य शिबीरामध्ये शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनमधील डॉ सतीश कुंभार ; डॉ चेतन राजोबा ; डॉ अमर माने ; डॉ प्रिन्सकुमार रजपुत ; डॉ अनिरुद्ध सुतार ; डॉ महेश बन्ने ; डॉ अतुल पाटील यांनी वैद्यकीय तपासणी केली तर सुहास पाटील ; रणजित आवळे; निलेश भाट आदींनी जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी व सेवासुश्रुषा केली.
सदर वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ विरश्री पाटील ; उपाध्यक्ष अमेय माने तसेच आमस्टर फार्मस्युटिकल सांगलीचे सर्वेसर्वा मलसिद्ध जकूने ; महाकाली फार्मा कवठेमहाकाळचे संजय माने व माऊली मेडिकल एजन्सी म्हैशाळचे मालक अशोक कस्तुरे यांचे सहकार्य लाभले.