सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की आमच्याकडे जे पहिल्या रांगेत बसायचे ते भाजपमध्ये जाऊन पाचव्या सहाव्या रांगेत बसतात. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या शेजारी बसणारे तिकडे गेल्यावर मात्र कोपऱ्यात गुपचूप असतात. स्टेज वर त्यांना जागा मिळत नाही. मोदींनी एक कटाक्ष टाकला की यांची मान वर करण्याची हिंमत होत नाही. यासाठी पंतप्रधान मोदी यांचे मला कौतुक वाटते. बारामती तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात त्या बोलत होते
त्या पुढे म्हणाल्या की सध्या देशात शासकीय व्यवस्थांची चेष्टा सुरू आहे. देशात लोकशाही राहिली नाही. सगळीकडे दडपशाही सुरू आहे. जो विरोधात बोलेल त्याचे तोंड बंद केले जाते. भाजपमध्ये काळा सदरा घालून जायचं आणि पांढरा सदरा घालून माघारी यायचं हेच सुरू अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याअंतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्याचा दौरा केला यावेळी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सभेच्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार येईल असे वाटत नव्हते मात्र सरकार आले सरकार जाईल अशी अपेक्षा नसताना सरकार गेले मात्र कोरोना काळात पांडुरंगाचीच इच्छा असावी की कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या माणसांच्या हाती सरकार असावे त्यामुळे कोरोना काळात चांगले काम करता आले. एकीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात ना खाऊंगा, ना खाने दूंगा मग चाळीस आमदारातील एकही आमदार उघडपणे पन्नास कोटी घेतले नाहीत असे म्हणत नाही. याचा अर्थ काय? राज्यात सध्याची कामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळातीलच आहेत. दहा महिन्यात राज्यातील सरकारने केवळ दिल्ली पुढे झुकायचे काम केले आहे. महाराष्ट्राचे महत्त्व सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक मधील जनतेने क चाळीस टक्के कमिशन घेणाऱ्यांना घरी बसवले आता आपण पन्नास खोके वाल्यांना येणाऱ्या काळात घरी बसवू. बेरोजगारी, महागाई वाढली असताना सरकार मात्र काहीच करताना दिसत नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बांधकाम समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे, सरपंच रवींद्र खोमणे, करण खलाटे, लालासाहेब माळशिकारे उपस्थित होते. यावेळी पोलीस दलात भरती झालेले पूजा पवार व औदुंबर तोरणे यांचा सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन खोमणे यांनी केले तर आभार मुगुटराव भगत यांनी मानले.