बारामती ! ICE ला मराठीत बर्फ म्हणतात....! मात्र दिल्ली येथे ICE ला काय म्हणतात खा.सुप्रिया सुळे यांनी सांगितलामजेशीर व तितकाच गंभीर फुलफॉर्म

Admin
3 minute read
सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
 साधारणपणे इंग्रजी मधील ICE या शब्दाला मराठीत बर्फ म्हणतात मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी या शब्दाचा दिल्ली येथे वापरला जाणारा मजेशीर व तितकाच गंभीर फुलफॉर्म लोकांना सांगितला.
   बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे गाव भेट दौऱ्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना ICE या इंग्रजी शब्दाचा अर्थ विचारला. एका लहान मुलीने बर्फ असे बरोबर उत्तर दिले. मात्र सुळे यांनी दिल्लीमध्ये I म्हणजे इन्कम टॅक्स, C म्हणजे सीबीआय तर E म्हणजे ईडी असे म्हटले जात असल्याचे सांगितले.
    विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्रातील अनेक यंत्रणांचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची या यंत्रणामार्फत चौकशी सुरू आहे. तर काही नेत्यांना जेलमध्येही जावे लागले आहे.
      सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीत जेव्हा आम्ही विरोधी पक्षाचे खासदार भेटतो तेव्हा अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची केंद्रातील तपास यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असल्याचे कळते. यावर आम्ही मिश्किल पणे तुमचा ICE सुरू आहे का? तुमच्या ICE च काय झालं, अशा चर्चा करत असतो. तेव्हा अनेक नेत्यांना नाहक त्रास दिला जातो. तुरुंगात टाकले जाते. मात्र चौकशी अंती त्यांच्या हाती काहीच लागत नाही. वास्तविक केंद्रात लोकशाही राहिली नसून दडपशाहीचे सरकार आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू दिले जात नाही. जो सरकार विरोधात बोलेल त्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशासाठी पदक मिळवणाऱ्या महिला कुस्तीपटूंनाही अमानुष वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने केंद्रीय यंत्रांची थट्टा लावली आहे असा आरोप सुळे यांनी केला.
To Top