सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाबळेश्वर : सचिन भिलारे
पावसाचे माहेरघर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवन वाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला. महाबळेश्वर आणि पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा आला आहे. सर्व परिसरात पावसाची संततधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जून महिन्यामध्ये एकूण ३० इंच पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद यंदाच्या जून महिन्यातच झाल्याचे पहावयास मिळाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार वाऱ्यासह दाट धुके व पावसाची संततधार सुरू होती. या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला असून वेण्णा लेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. याच वेण्णा तलावामधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना पाणीपुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वरात पावसाने ५० इंचाचा टप्पा गाठला की वेण्णा तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे. दरम्यान वेण्णा लेक परिसरात पर्यटकांनी धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती. अनेक जण दाट धुक्यात सेल्फी घेताना पहावयास मिळाले. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत आहे