सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील ओंकार दत्तात्रय हेगडे याने पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेतच त्याने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यानंतर सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी आणि बारावी पूर्ण करून सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालयात त्याने मेकॅनिकल इंजिनिअर पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच सर्व शिक्षण ग्रामीण भागात घेऊनही त्याने हे यश मिळविले असल्याचे सोमेश्वर परीसरात त्याचे कौतुक होत आहे.
सोमेश्वरनगर मध्ये राहूनच त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास केला. पूर्व परीक्षा २०२० तर मुख्य परीक्षा सन २०२१ मध्ये झाली. न्यायालयीन प्रक्रियेत बराच काळ गेल्यानंतरही निकाल नव्हता. अखेर मंगळवारी निकाल लागल्यानंतर ओंकार हेगडे याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. ओंकार याचे वडील दत्तात्रय हेगडे हे निवृत्त प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. त्याच्या यशात कुटुंब आणि मित्रपरीवाराचे मोठे योगदान असून सोमेश्वर परीसरातून त्याचे अभिनंदन होत आहे.