सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यातील कोळी समाज बांधव हे भाजप व मित्र पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभपणे मिळावे, यासह समाजाचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू व हे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.16) दिली.
इंदापूर येथे कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन कोळी समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कोळी समाज बांधवांशी चर्चा करीत संवाद साधला. महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी बांधवांच्या जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांच्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोळी महासंघाचे शिष्टमंडळ यांच्यासमवेत लवकरच बैठक लावून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष अँड.चेतन पाटील हे कोळी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोळी महासंघ हा भाजप व मित्र पक्षांच्या पाठीशी असल्याने कोळी बांधवांचे सर्व प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. या निवेदनावर राजेंद्र हजारे, अमर धुमाळ, लालासाहेब माने, राजेश लावंड, नामदेव सुरवसे, अनिल जाधव, किरण अंकुशराव, चेतन शिंदे, बाळू हजारे, प्रशांत हजारे, संतोष माने, शत्रुगुण घाडगे, राहुल घाडगे, अभिजीत जाधव, भाऊसाहेब रोकडे आदी कोळी बांधवांच्या सह्या आहेत.
______________________________