सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
प्रतिनिधी : धनंजय गोरे
"गाव करील ते राव करील काय"या म्हणीप्रमाणे जर गावाने एखादी गोष्ट ठरवली ती साध्य होतेच असाच प्रत्यय सातारा तालुक्यातील करंडी येथील गावात आला आहे. डोंगराच्या कडेला वसलेले करंडी हे गाव,डोंगरदर्याच्या सानिध्यात वसलेलं शेती हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल् साताऱ्याच्या जवळच असलेलं करंडी गावात आजूबाजूला गायरान क्षेत्र ही आहे मात्र उन्हाळ्यात हे क्षेत्र ओसाड पडते त्यामुळे संपूर्ण गावाने ठरविले की या गायरान क्षेत्रांमध्ये वृक्ष लागवड करायची.
वृक्ष लागवड केल्यामुळे आजूबाजूचा परिसरही उन्हाळ्यात ही हिरवागार राहील जनावरे गुरेढोरे चढताना त्यांनाही चारा तयार होईल. त्यासाठी परिसरात वृक्ष लागवड करायची यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने छोटी वृक्ष लागवडीसाठी झाडेही मिळविण्यात आली. त्या वृक्षांचीच लागवड करण्याचे संपूर्ण गावाने ठरविले त्यासाठी ही लागवड करत असताना कामगार न लावता संपूर्ण गावाने एकत्रित येऊन कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून या दिवशी संपूर्ण गाव एकत्र आले.व सुमारे एक हजार वृक्षाची लागवड केली.
एकी हेच बळ दाखवत करंडी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आजी-माजी सैनिक संघटना, ग्रामस्थ, महिला बचत गट श्री समर्थ माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंडी शिक्षक-विद्यार्थी व तरुण वर्ग असे सगळे एकत्रित आले व या डोंगर रांगात गायरान क्षेत्रांमध्ये विखरून सर्वांनी वृक्ष रोपण केले. या कामी जवळपास २०० लोकांचा सहभाग होता. यामध्ये पेरू, आवळा, चिंच, सागवान, वड, पिंपळ, बांबू, कडीपत्ता, लिंब, लिंबू, जांभूळ, सिसम, इ. वृक्षांचे वृक्षारोपण करून एका वेगळ्या पद्धतीने कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. याचबरोबर सर्वांनी एकत्रित येऊन स्नेहभोजन ही केले यावेळी गाव पण काय असते हे सर्वांनी पाहिले.
यापुढेही जे काही सामाजिक उपक्रम असतील ते अशाच सामुदायिक रित्या यशस्वी करण्याचे सर्वांनी ठरवले व या लावलेल्या झाडांची निगाही राखण्याचे सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.