सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीत खानापूर ता.भोर येथील ज्ञानेश्वर रामचंद्र कोंढाळकर यांच्या घराची भिंत कोसळली असून मोठे नुकसान झाले.
तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू असला तरी वीसगाव खोरे तसेच हिरडस मावळ खोऱ्यात दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे.अतिवृष्टीत कडधान्य पिके पाण्यात असल्याने पिके वाया जाण्याची भीती असतानाच परिसरातील बहुतांशी लोकांच्या घरांच्या भिंती भिजलेल्या अवस्थेत आहेत.यामुळे परिसरात घराच्या भिंती कोसळने तसेच छप्पर वाऱ्याने उडून जाणे अशा घटना घडत आहेत. पाठीमागील आठवड्यात उत्रोली येथे पाऊस सुरू असतानाच एक घर पूर्णपणे कोसळले होते तर रविवार दि.३० खानापूर येथील कोंढाळकर यांच्या घराची भिंत कोसळली असून यात घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. कोंढाळकर यांच्या घराची भिंत कोसळलेली स्थानिक तरुणांना माहिती मिळताच तात्काळ तरुणांनी धावपळ करून भिंतीच्या ढीगाऱ्याखाली सापडलेले अन्नधान्य तसेच संसार उपयोगी वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून घराची भिंत बाहेरच्या बाजूला पडली असल्याने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही.