बारामती ! घरात जायला रस्ताच नाही...दोन वर्षांपासून प्रशासनाचे दरवाजे ठोठावून अजून न्याय नाही...मुरूमचे इनामदार कुटुंब करणार ग्रामपंचयात समोर उपोषण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वतःच्या घरात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने आणि गेल्या दोन वर्षापासून शासन दरबारी अर्ज करून आणि प्रशासनाचे दरवाजे ठोठवूनही रस्ताच मिळत नसल्याने मुरुम(ता. बारामती) येथील रशीद इनामदार व त्यांचे कुटूंबातील सदस्य सोमवार(दि.१०) पासून मुरुम ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत.                 इनामदार हे गेल्या सत्तर वर्षांपासून मुरूम येथील रहिवाशी आहेत शिवाय त्यांना येण्या-  जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता होता. सदर रस्ता दिलावर हसन इनामदार यांनी अडवून रशीद इनामदार यांना त्यांच्याच घरात जाण्या-येण्यास अडचण निर्माण केली असल्याने आणि बारामतीचे प्रशासन त्यांना रस्ता देण्यास असमर्थ ठरल्याने अखेर रशीद इनामदार यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
         याबाबत रशीद इनामदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामपंचायत मुरुम, बारामतीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना रस्ता मिळावा यासाठी निवेदन दिले आहे. मुरुम ग्रामस्थांनीही सह्या करून इनामदार यांना रस्ता मिळावा म्हणून पाठिंबा दिला आहे. सिटी सर्व्हे ३८७ मध्ये रशीद इनामदार यांचे घर आहे याठिकाणी उत्तर दिशेला गावठाण आहे. याठिकाणातूनच रस्ता मिळावा अशी मागणी रशीद इनामदार यांनी केली आहे. ३८८ मध्ये दिलावर इनामदार यांचे घर आहे त्यांनी पूर्वेकडे अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढावे यासाठी तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले होते. गटविकास अधिकारी यांनी संबंधित जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापही येथील मोजणी झालेली नाही. नकाशात गावठाण स्पष्टपणे दिसत आहे. गावठाण जागेतून रस्ता मिळावा यासाठी रशीद इनामदार यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे मात्र त्यांना न्याय मिळत नसल्याने सोमवार पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मुरुम येथील गावठाण जमिनीवर अनेकजण स्वतःची मालकी हक्क गाजवत आहेत याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने मोजणी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
To Top