मेढा ! खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्यात आहार हा महत्वाचा घटक असतो : आयर्नमन डॉ. सुधीर पवार

Admin
3 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम--- 
मेढा : ओंकार साखरे
कोणत्याही खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करण्यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आहार.कारण योग्य आहारावरच खेळाडूंचे वजन, शरीरातील चरबीचे, पाण्याचे प्रमाण, स्नायूची, श्वसनाची आणि हृदयाची कार्यक्षमता आणि ताकत अवलंबून असते." असे मत सातारा जिल्ह्याचे पहिले आयर्नमॅन मेढा येथील सुप्रसिद्ध डॉ.सुधीर पवार यांनी व्यक्त केले.
          जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.
        " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले  की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते." असा सल्ला दिला.
           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.मेजर अशोक व्ही.गिरी यांनी सांगीतले की,
" खेळाडूंनी आहारात अचानक बदल करू नये,जो आहार सुरुवातीपासून तुम्ही घेता,तोच कायम ठेवला पाहिजे,प्रत्येक खेळाडूने शारीरिक क्षमते बरोबरच आहाराला महत्व आहे " असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.    
          कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात स्पोर्ट्स बुलेटिन हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख जिमखाना विभागप्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.शंकर गेजगे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. उल्हास जाधव यांनी मानले.
To Top