सोमेश्वर रिपोर्टर टीम---
बारामती : महेश जगताप
स्वतःला महाराष्ट्र केसरी होता नाही आलं...महाराष्ट्र केसरीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी...बारामती तालुक्यातील मगरवाडी येथील तानाजीबापू सोरटे यांनी स्वतःच्या घरापुढेच कुस्ती केंद्र उभारलं.. आज त्या कुस्ती केंद्रात नव्वद पहेलवान आपलं नशीब अजमावत आहेत. या कुस्ती केंद्रातून एकतरी महाराष्ट्र केसरी घडवणारच अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे.
वस्ताद स्वर्गीय हिंदकेसरी पहिलवान गणपतराव आंधळकर यांचे शिष्य बारामती तालुक्यातील मगरवाडी येथील पैलवान तानाजीबापू सोरटे यांनी १९६६ -१९६७ मध्ये न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे तालीमत दाखल झाले.
१९७० ते १९७३ च्या काळात महाराष्ट्रातील एक दोन नंबरच्या जोडीत त्यांच्या तालमीतील मोठ्या जोडीतील पैलवानांच्यात त्यांचा समावेश होत होता. पैलवान युवराज पाटील, हिरामण बनकर, अग्नेल निर्गो यांच्या जोडीत बापू खेळू लागले. परंतु १९७२ ला अग्नेल निग्रो सोबत कुस्ती करत असताना पैलवान तानाजीबापू सोरटे यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि डॉक्टरांनी कुस्ती सोडण्याचा सल्ला दिला. पुढे १९७४ ला पै. युवराज पाटील १९७६ ला पै. हिरामण बनकर महाराष्ट्र केसरी झाले. तर १९७५ ला पै.अग्नील निग्रो उपमहाराष्ट्र केसरी झाले यावरून पैलवान तानाजीराव बापू सोरटे यांची क्षमता किती आहे याचा अंदाज आपण करू शकतो.
महाराष्ट्र केसरीचे भंगलेले स्वप्न पै.तानाजीबापू सोरटे यांना स्वस्थ बसू देत नव्हते कारण लाल मातीशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांनी घराशेजारीच नवनाथ कुस्ती केंद्र उभारले आहे येथे परिसरातील ७४ मुले कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत या तालमीतील वैशिष्ट्य असे की नवनाथ कुस्ती केंद्रातील मल्लांकडून एकही रुपया ही फी घेतली जात नाही स्वतःच्या दूध डेअरीतील पैलवान पेतील तेवढे पैलवानांना मोफत दूध दिले जाते. बाहेर कुस्ती जिंकून आलं की त्या पैलवानांना तूप देखील मोफत दिले जाते.
मुळशी केसरीची गदा जिंकणारा पै. शिवाजी टकले याच केंद्रातील होते. तसेच अनेक जण नवनाथ कुस्ती केंद्रातील पोलीस, भारतीय सैन्य दल यामध्ये भरती झाले आहेत. तसेच याच नवनाथ कुस्ती केंद्रकरिता वस्ताद राम घोरपडे यांची निवड केली आहे. सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, मागरवाडीचे सरपंच अजित सोरटे, प्रवीण सोरटे यांचे देखील पैहलवानांना नेहमी सहकार्य लाभत आहे. पेहलवान तानाजीबापू सोरटे यांचे देखील मार्गदर्शन सतत असते. बापूंनी या नवनाथ कुस्ती केंद्रात एक तरी महाराष्ट्र केसरी घडवणारच अशी इच्छा 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना व्यक्त केली.