बारामती ! तहानलेल्या भिलारवाडी व देऊळगाव रसाळ या गावांची आर. एन. शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने भागवली तहान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामतीच्या जिराईत भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः भिलारवाडी आणि देऊळगाव रसाळ या गावात पाण्याची परिस्थिती बिकट झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते आर. एन. शिंदे व आशा शिंदे या दांपत्याने 'अक्षय शिंदे फाऊंडेशन'मार्फत दोन्ही गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे गाव कारभाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
        बारामतीच्या जिराईत पट्ट्यात पिकांपाठोपाठ आता माणसे आणि जनावरांचीही होरपळ सुरू झाली आहे. राज्य सरकार दुष्काळ अथवा टंचाई घोषित करत नसल्याने प्रशासनाचेही हात बांधलेले आहेत. या पार्श्वभूमीवर देऊळगाव रसाळ गावातील विहीरी कोरड्या पडल्यावर पाण्यासाठी विशेष ग्रामसभा लावण्यात आली. ही बाब अक्षय शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी एक बारा हजार लिटर क्षमतेचा टँकर भाड्याने घेतला आणि पाणीपुरवठा सुरू केला. याचबरोबर शेजारच्याच भिलारवाडी गावातही जनावरांची संख्या मोठी आहे पण चिमणी प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तिथेही तोच टँकर पाणीपुरवठा करत आहे. मागील तीन दिवसांपासून ह्या फेऱ्या सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील वर्षीही शिंदे फाऊंडेशनने मुर्टी, मोढवे, उंबरओढा या गावांना पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठा केला होता.

शिंदे म्हणाले, गावाची पाण्याची मागणी येताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूचना केल्या. यानुसार तातडीने दोन्ही गावांसाठी पाणीपुरवठा सुरू केला. बारामती नगरपालिकेने टँकमधून पाणी भरण्याची परवानगी दिल्याने तिथून दररोज पाच ते सहा टँकर पाणीपुरवठा होत आहे. पाऊस पडेपर्यंत टँकर सुरू ठेवणार आहे.
--------------------------
भिलारवाडीचे उपसरपंच कल्याण चव्हाण म्हणाले, ओढा खोलीकरण झाले आहे पण पाऊसच नसल्याने विहीरी पूर्णपणे आटल्या आहेत. टंचाई घोषित झालेली नसल्याने प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यास अडचणी होत्या. त्यामुळे शिंदे आमच्यासाठी देवासारखे धावले. अजितदादांना आज पुरंदर उपासाचे पाणी रुई तलावात सोडा असे निवेदन दिले आहे.
------------------------
देऊळगाव रसाळचे उपसरपंच दत्तात्रय वाबळे म्हणाले, जानाई शिरसाई योजनेचं पाणी मिळालं नाही. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आणि त्यावर ग्रामसभा लावली. त्याच दिवशी शिंदे मदतीसाठी धावले.
To Top