सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संरोष म्हस्के
आजपर्यंत सोन्याचे दागिने,पैशांची चोरी, वाहनाची चोरी अशा विविध प्रकारच्या चोऱ्या होण्याच्या घटना घडत होत्या.मात्र सद्या चक्क कुत्र्याची चोरी करणारी टोळी भोर तालुक्यात सक्रिय झाली असून भाटघर धरणाजवळील संगमनेर (माळवाडी) ता. भोर येथील शेतकऱ्याच्या २० हजाराहून अधिक किमतीच्या कुत्र्याची चोरी झाल्याची घटना घडली.
ऐकावे ते नवलच याप्रमाणे संगमनेर येथील शेतकरी संतोष जनार्दन बांदल यांचा जनावरांचा गोठा संगमनेर-भूतोंडे रस्त्यावर लोकवस्ती पासून काही अंतरावर रस्त्यालगत आहे.या गोठ्याची राखण सदरचा कुत्रा करीत होता.दोन दिवसापूर्वी दुपारच्या दरम्यान शेतकरी संतोष बांदल गोठयापासून थोड्या अंतरावर असलेल्या हॉटेल देवता शेजारी जनावरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी त्याच्याबरोबर त्यांचा काळया रंगाचा पाळीव कुत्रा सोबत होता.काही वेळाने सदरचा कुत्रा गोठ्याकडे मुख्य डांबरीकरण रस्त्याने एकटा जात होता.यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या दोन भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दुचाकीस्वारांनी कुत्र्याला पकडून धूम ठोकली चोरी झालेल्या कुत्र्याचा रंग काळा असून शेपटीचा शेवटचा तीन इंचाचा भाग व पायाच्या नखाच्या शेजारील भाग पांढरा आहे. सदरचा कुत्रा निदर्शनास आल्यास संबंधित शेतकऱ्यास माहिती द्यावी असे शेतकऱ्याकडून सांगण्यात आले.