खंडाळा ! तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा प्रताप ? बोगस बिले दाखवून औषधांचा खर्च जेवणावळीवर : आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
खंडाळा तालुका आरोग्य अधिकाऱ्याने बोगस बीले दाखवून लाखो रूपयांचा अपहार केला असल्याची तसेच यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी आलेला नीधी चक्क जेवणावळीसाठी खर्च झाल्याचा दाखवण्याचा प्रकार झाला असल्याची चर्चा लोणंद, शिरवळसह संपूर्ण खंडाळा तालुक्यात होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

खंडाळ्याचे तालुका आरोग्य अधिकारी पाटील यांचे यापूर्वीदेखील अनेक भ्रष्टाचाराचे किस्से चर्चेत आले होते मात्र अर्थपूर्ण तडजोडी करण्यात हातखंडा असल्याने त्यांनी अशी प्रकरणे दाबल्याचे आरोग्य विभागातील अनेकजणांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद यांच्यमार्फत वारकरी व भाविकांना आरोग्य सेवा, औषधोपचार, स्वच्छ पाणी पुरविणे इत्यादी कारणांसाठी जिल्हा परिषदेने दिलेला निधीपैकी तब्बल १ लाख पस्तीस हजारांचा खर्च हा जेवणावळीवर दाखवण्याचा प्रकार तालुका आरोग्य अधिकारी यांनी केल्याची खात्रीशीर बातमी पंचायत समितीतील एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितली. तर औषधांसाठीचा निधी जेवणावळीवर खर्च झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत चौकशी होवून योग्य ती कारवाई होणार का याबद्दल कर्मचाऱ्यांत उलटसुलट चर्चा चालू आहेत. तर याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सर्व काही नियमानुसार केलेले असल्याचे सांगीतले आहे.

याच अधिकाऱ्याने राष्ट्रीय आरोग्य मिशन मधूनही फक्त कागदोपत्री खर्च दाखवून व बोगस बिले टाकून शासकीय निधी लाटल्याच्या अनेकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेवून शासनाने त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोम येथे दुय्यम आरोग्य अधिकारी या पदावर प्रशासकीय बदली केलेली आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा यांनी त्यांना दि. ३० जून २०२३ रोजी कार्यमुक्तही केलेले आहे, तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरत मागील तारखेची ऑर्डर काढुन नियमबाह्य पध्दतीने पुन्हा खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळवलेला आहे, त्यामुळे बदली धोरणालाच हरताळ फासलेला आहे. एवढे सगळे उघड भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करणार का ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-----------------------------
लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृहाची दूरावस्था झालेली असतानाही त्याच ठिकाणी महिलांची प्रसूती करावी लागत आहे. पालखीकाळात आलेला नीधी औषधांवर खर्च न करता जेवणावळीवर अव्वाच्या सव्वा खर्च दाखवण्याचा प्रताप करूनही इतर निधीतून प्रसूतिगृहाची दूरूस्ती सहज शक्य असताना तालुका आरोग्य अधिकारी यांनी गरज नसलेल्या छोट्या डागडूजी दाखवून त्याचीही मोठ्या रकमेची बनावट बीले दाखवून मोठ्या रकेमेचा अपहार केल्याची चर्चा आहे. याबाबत लोणंद येथील आरोग्य अधिकारी डॉ. अलोक बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर आपणांस काहीच बोलायचे नाही असे सांगत अंग काढून घेतले.
To Top