सोमेश्वर रिपोर्टर टीम---
खंडाळा : प्रतिनिधी
पुणे-बंगळुरू महामार्गावर दिं १२ रोजी पुण्याहून साता-याच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात एका युवकाला धडक देऊन चारचाकी वाहन धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने वाहनातील सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पुण्याहून डफळपूर ता.जत या ठिकाणी निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (वय 25) व अविनाश भाग्यवंत उबाळे (वय 29) हे दोघे लघुशंकेसाठी कॅनॉलजवळ थांबले असता पाठीमागून आलेली कार (क्र.mh १२ t.y.१०६६) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने राहुल उबाळे यांना धडक देऊन कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत कारमधील चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (वय 42), श्रीमंत शिंदे (वय 70), राजश्री श्रीपती शिंदे (वय 37), संकेत श्रीपती शिंदे (वय 13), संस्कृती श्रीपती शिंदे (वय ८, सर्व रा.अथनी, ता.बेळगाव, सध्या रा. पुणे) या पाच जणांना चार चाकीतून बाहेर काढले. या अपघातामध्ये राहुल उबाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासहित सर्वच अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे a.s.i राजु अहिरराव, पो.हवा. विजय पिसाळ, चालक दत्तात्रय धायगुडे, पो. नाईक अतुल आवळे, पो हवा. पंडित, पो.ना. सचिन शेलार, पो. हवा. उद्धव शिंदे व कर्मचारी, हायवे पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताबाबत अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.