सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल ऊसदराची कोंडी फोडत राज्यात उच्चांकी दर दिला.हे करत असताना संचालक मंडळाने सभासद व बिगर सभासद यांच्यात दुजाभाव न करता दोघांनाही समान ऊसदर दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
राज्यातील अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली असून सन २०२२-२३ या हंगामात गाळप झालेल्या उसाला तब्बल ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला आहे. ऊस दराची कोंडी फोडत कारखान्याने उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच एवढा दर मिळाल्याने सभासदांनी संचालक मंडळाचे आभार मानले आहेत. एफआरपीपेक्षा तब्बल ५०० रुपये जास्त दर देणारा सोमेश्वर राज्यात पहिलाच कारखाना ठरला असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने हा दर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी (दि.८) रोजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामध्ये गत हंगामातील ऊसाला टनाला ३ हजार ३५० रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय संचालक मंडळाने घेतला. यावेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, सुनिल भगत, शैलेश रासकर, आनंदकुमार होळकर, संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सोमेश्वरने गेल्या हंगामात तुटून गेलेल्या उसाला २ हजार ८५० रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५० रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. त्यामुळे सोमेश्वरच्या सभासदांना टनाला ५०० रुपये वाढवून मिळणार आहेत.
जगताप पुढे म्हणाले की, गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने एकुण १२,५६,७६८ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी ११.९२६ टक्के साखर उतारा राखत १४,६७,९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन ८,९२,५१,७७९ युनिट्सची वीजनिर्मिती केली असुन ५,००,७१,७९७ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातुन ९१,०७,२८७ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत ४१,९५,९८४ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. सन २०२२-२३ हंगामाची एफआरपी २८५० रुपये होती त्यावर कारखान्याने आजअखेर सभासद व विगर सभासद यांना २९०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. उर्वरीत रक्कम दिवाळीपुर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.
काटकसर व उत्तम नियोजनपुर्व कारभार, अजित पवार यांचे मार्गदर्शन, साखर निर्यातीचे व विक्रीचे धोरण, डिस्टीलरीमधून मिळालेले ५० कोटी रुपये उत्पादन यामुळे सोमेश्वर सर्वोच्च दर देवू शकला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
----------------------
गेल्या ५ हंगामात कारखान्याने सलग तीन हजाराहून अधिक ऊसदर दिला आहे. पुढेही कार्यक्षेत्रातील व गेटकेनधारक व सभासद यांना एकसारखाच सर्वोच्च ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहिल. सोमेश्वरने संपुर्ण राज्यात नावलौकीक मिळविला असुन यापुढील काळात सर्वोच्च ऊसदराची तसेच सभासद - बीगर सभासद एकच ऊसदराची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व सभासद शेतक-यांनी यापुढील काळातही सोमेश्वरलाच ऊस घालावा
पुरुषोत्तम जगताप- अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.