सोमेश्वर रिपोर्टर टीम---
पुरंदर : प्रतिनिधी
एकत्र कुटुंब पद्धती ही खूप जुन्या काळातली गोष्ट आहे, आता सगळीकडे चौकोनी कुटुंब दिसत आहेत. मात्र पुरंदर तालुक्यातील दवणेवाडी येथे 85 जणांची तीन पिढ्यांची कुटुंब एकत्र सांभाळण्याची किमया निवृत्ती गोविंदराव धुमाळ यांनी केली होती.
अशा निवृत्ती धुमाळे यांचे 1 ऑगस्ट रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. या निमित्ताने एकत्र एक कुटुंबाचा प्रवर्तक हरपल्याची व भारतीय स्वातंत्र्य मिळताना पाहिलेला माणूस हरपल्याची भावना पुरंदर तालुक्यात व्यक्त होत आहे. निवृत्ती गोविंदराव धुमाळ यांचे दवणेवाडी येथे राहत्या घरी वयाच्या 103 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते दवणेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. वयाचे 100 वर्षे पूर्ण केली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांचा जंगी शतकी वाढदिवस साजरा केला होता पुरंदर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आमदार नेतेमंडळी आवर्जून या शतकी महोत्सवास उपस्थित होती. याप्रसंगी त्यांनी पाहिलेला स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्याचा उदय या गोष्टींवर उहापोह झाला होता. त्यांच्या निधनानंतर या आठवणी आता पुरंदरवासीय काढत आहेत. बारामतीतही मुरूम, वाणेवाडी, गायकवाडवस्ती, शेंडकरवाडी या परिसराशी त्यांचे ऋणानुबंध होते.
दवणेवाडीचे माजी आदर्श सरपंच सुखदेव धुमाळ यांचे ते वडील होते. सुभाष धुमाळ अनिल धुमाळ हे त्यांचे पुत्र तर संजय धुमाळ महेश धुमाळ शरद धुमाळ हे त्यांचे पुतणे होत.