सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
खंडाळा : प्रतिनिधी
विंग ता.खंडाळा येथील रियटर इंडियाच्या काही अपप्रवृत्ती कामगारांमुळे विनाकारण बेकायदेशीर संपाची ठिणगी पडली आहे. यामध्ये संपकरी कामगारांकडून खालच्या पातळीवर जाऊन कंपनी व्यवस्थापन व कंपनीच्याबाबतीत बदनामी केली जात असून संपाच्या माध्यमातून फोफावणा-या अपप्रवृत्तींना आवरणे गरजेचे आहे अशी मागणी रियटर इंडियाच्या कामगारांनी खंडाळा तहसिलदार अजित पाटील, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही कायदेशीर मागण्या नसतानाही मागील सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा संप करुन काही अपप्रवृत्तींनी कंपनी बंद करण्याचा घाट घातला आहे.कंपनी व कामगारांचे कौटुंबिक नाते असताना देखील व खेळीमेळीचे वातावरण असताना ज्या कंपनीचे आपण मीठ खाल्ले त्याच ताटात थुंकण्याचा प्रयत्न करीत बदनामी करणे, खोटे आरोप करणे,तथाकथित युनियनची स्थापना केल्यापासून युनियनमध्ये सहभागी न झाल्याने सामूहिक बहिष्काराचे हत्यार उपसणे,कंञाटी कामगार संपात सहभागी न झाल्याने त्यांना कंपनीतून काढून टाकण्याकरीता प्रयत्नशील राहून उत्पादन जास्त होऊ नये याकरीता कामगारांना अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार संबंधितांनी आजपर्यंत केलेले आहे.या अपप्रवृत्तींनी संपाच्या गोंडस नावाखाली घोषणाबाजी,प्रदर्शन करणे,कंपनीच्या वाहनांसमोर मुद्दामपणे वाहने लाऊन कामगारांना कामावर जाण्यापासून अडथळा निर्माण करण्याच्या प्रकारामुळे कंपनीमध्ये काम करण्याकरीता जाणाऱ्या कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कंपनी उत्पादनात सातत्याने होणाऱ्या अडथळ्यांमुळे कंपनी व्यवस्थापनाकडून सदरचा प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरीत किंवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून कामगारांच्या उदरनिर्वाहचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.वास्तविकःकोणतेही संयुक्तिक कारण नसताना संप करुन प्रशासानाला वेठीस धरणा-या अपप्रवृत्तींना आवर घालावा अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा कामगारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.त्याचप्रमाणे कामगारांना कामावर जाण्याकरीता अडथळा निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तींना प्रशासनाने आवरावे व कंपनीची बदनामी करणाऱ्यांना आवर घालावा असे निवेदनात म्हटले आहे.