सोमेश्वर रिपोर्टर टिम----
जावली : धनंजय गोरे
जावळी तालुका दुर्गम डोंगराळ असा. पण इतिहास काळापासून याचे अनन्यसाधारण महत्व आहे. याच डोंगरकपारित स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हुतात्म्य पत्करले. या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आजही जावळीकरांनी जपल्या आहेत.या लढ्यात तालुक्यातील बामणोली तंर्फ कुडाळ येथील हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या आठवणी हुतात्मा स्मारकातून समस्त जावलीकर जागवत आहेत.हौतात्म्य पत्करणाऱ्यांच्या स्मृती जपण्यासाठी यातून प्रयत्न होत आहे.
बामणोलीतर्फे कुडाळ गावचे वीर सुपुत्र हुतात्मा सर्जेराव जाधव लहानपणापासूनच चळवळीच्या लढ्याने प्रेरित झाले होते घरची परिस्थिती बेताची असताना रोजगारासाठी मुंबई या ठिकाणी गेल्यावर सैनिक सेवा दलामध्ये सहभागी झाले. ब्रिटिशांच्या जुलमी अत्याचार प्रवृत्तीमुळे १९४६ मध्ये त्यांनी सेवादलाने संघर्ष करण्यासाठी कंबर कसली. यामध्ये सर्जेराव जाधव यांनी पुढाकार घेतला होता. त्या काळातील ब्रिटिशांच्या अत्याचारामुळे ते अस्वस्थ झाले होते. यातच २४ फेब्रुवारी १९४६ रोजी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोषाचा स्फोट झाला. यात सर्जेरावही बंडाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये पुढे होते. ब्रिटीश सैनिकांनी महिलांवर लाठीमार सुरू केला हे पाहून सर्जेरावांचे पित्त खवळले. त्यांनी याचा जोरदार प्रतिकार केला.हातामध्ये दगड घेऊन त्यांनी इंग्रज सैन्यावर वर्षाव केला. यात अनेक ब्रिटिश सैनिक बेशुद्ध झाले. यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यात त्यांना हुतात्म्य आले.या स्वातंत्र्यालढ्यात देशासाठी अनेकांनी प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले.
या हुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरुपी रहाव्यात यातून युवा पिढीला स्फूर्ती मिळावी यासाठी अनेक ठिकाणी स्मारके उभारली आहेत. जावळी तालुक्यातील १९२६ ते ४७ या काळात देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून बामणोली कुडाळ या ठिकाणी हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. याकरिता भानुदास तरडे (इनामदार)कुटुंबीयांकडून दोन एकर सोळा गुंठे जमीन दिली होती.याचे काही दिवसांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले आहे.आज या स्मारकाची व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवली जात असून त्यांच्या बलिदानाची गाथा सर्वानाच प्रेरणादायी ठरत आहे.या हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न बामणोलीकरांकडून होत आहे.
१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतअनेकांनी सहभाग घेत तुरुंगवासही भोगला.अनेकांना या स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी हुतात्म्य पत्करले. त्यांच्या त्यागाच्या स्फूर्ती जागविण्यासाठी आज अनेक हुतात्म्यांचे स्मृतिस्तंभ उभारले आहेत.मात्र ही स्मारके कशासाठी निर्माण केली आहेत याचे भान आजच्या तरुण पिढीला असायला हवे.आजच्या पिढीला ही स्मारके माहित नाहीत.केवळ क्रांतिदिनीच हुतात्म्यांचे स्मरण होण्यापेक्षा इतिहासाच्या पुस्तकांपलिकडे जाऊन बलिदान दिलेल्या स्मारकाचे पावित्र्य आणि महत्व प्रत्येकाने समजावून घ्यायला हवे.