बारामती ! लहान बहीण 'मुक्ताई'च्या सायकलवर बसून शाळेत जाणारा होळचा अपंग 'ज्ञानेश्वर' एमपीएससीतून बसणार आता मंत्रालयातील सहाय्यक लिपिक पदाच्या खुर्चीवर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
होळ-साळोबावस्ती ता. बारामती येथील दोन्ही पायांनी अपंग असणाऱ्या ज्ञानेश्वर पांडुरंग मदने याने जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात अपंग प्रवर्गातून सहावा येत मंत्रालयातील साहाय्यक लिपिक पदाला गवसणी घातली. 
            अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्याने मित्र परिवाराच्या सहकार्याने यश खेचून आणले. मित्रांचा लाडका असलेला माऊली लहानपणापासून शाळेत हुशार होता. आई-वडील शेतमजूर तर डोक्यावर गवताच छप्पर असणाऱ्या माउलीला लहानपणापासून शिकण्यात गोडी होती. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा साळोबावस्ती येथे झाले तर माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कुल वाणेवाडी याठिकाणी झाले. वाणेवाडी शाळेत असताना लहान बहीण मुक्ताईने वयाने मोठ्या असलेल्या ज्ञानेश्वराला सायकलच्या कॅरेजवर बसवून आणत पाचवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलाची साथ दिली. 
            सोमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातून बीएससी केमिस्ट्री चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सहा वर्षे विवेकानंद अभ्यासिकेतून एमपीएससीचा अभ्यास केला. २०२१ मध्ये सहाय्यक लिपिक पदासाठी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल सद्या लागला असून यामध्ये त्याची मंत्रालय सहाय्यक लिपिक या पदावर निवड झाली आहे. तर २०२२ मध्ये ज्ञानेश्वरने कर सहाय्यक पदाची परीक्षा दिली असून याचा निकाल अद्याप बाकी असून यामध्ये हमखास यश मिळेल असा विश्वास ज्ञानेश्वर ने व्यक्त केला आहे.
To Top