सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद ता. खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडेगाव ता. फलटण गावच्या हद्दीत जलसेवा ॲक्वा येथील सचिन महादेव मोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत कपाटातील रोकड लांबवली.
पाडेगाव ता. फलटण येथील गावठाण ते सर्कलमळा रोडवरील गावठाणालगत असलेल्या सचिन महादेव मोरे यांच्या जलसेवा ॲक्वाच्या प्लांटलगत असलेल्या घरात दि. २३ रोजी मध्यरात्री साडेबारा ते पावणेएक वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत कपाटातील पाच हजारांची रोकड लंपास केली. यावेळेस सचिन मोरे यांच्या आई जाग्या झाल्याने त्यांनी हुशारी दाखवत आपल्या दुसर्या खोलीत झोपलेल्या आपल्या मुलाच्या नावे हाक मारल्याने चोरटे पुढील धोका ओळखून पसार झाले मात्र त्यावेळेस पळताना एकाचा रूमाल घराबाहेरच पडला तर नकली ज्वेलरीही चोरट्यांनी घराबाहेरच टाकून पळ काढला.
या वेळेस सचिन मोरे यांनी जागे झाल्यावर आजूबाजूच्या घरातील लोकांना फोन करीत चोर आल्याचे सांगितल्यावर बरेचजण त्याठिकाणी गोळा झाले. तसेच लोणंद पोलीसांना सदर घटनेची माहिती फोनवरून देताच सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी तातडीने गस्तीवरील गाडी घटनास्थळी पाठवली. गस्तीवरील गाडीतून पोलीस उपनिरीक्षक कय्युम मुल्ला व पोलीस हवलदार धनाजी भिसे यांनी घटनास्थाची पाहणी केली.
सध्या लोणंद पोलीस ठाण्याच्या परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी प्रत्येक गांवात "ग्राम सुरक्षा दल" स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गावाच्या सुरक्षीततेच्या दृष्टिने ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्रगस्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.