सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली असून गेले आठ दिवस पाणीपाणी करण्याची वेळ नागरीकांच्यावर आल्याने अल्प कालावधीतच पून्हा एकदा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याने पाणी पाणी करून जनता हैराण झाली आहे.
मेढा नगरवासियांना वेण्णा नदी पात्रातुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नदी पात्र बर्यापैकी भरलेले असून कण्हेर धरण जलाशयामुळे पाण्याचा फुगवटा मेढ्यापर्यत आला आहे. वेण्णा नदी पात्रात मुबलक पाणी साठा असताना तांत्रीक बाबींची सबब पुढे करून जनतेला पाण्यासाठी भटकंती करावयास लावायला नगरपंचायतीला धन्यता वाटत आहे.
नदी पात्रात पाणी उपसा करणाऱ्या मोटर मध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे कारण सांगीतले जात असून वारंवार दुरुस्ती साठी लोकांना आठ - आठ दिवस पाण्यासाठी वेटीस धरण्याचे प्रकार नगरपंचायती कडुन पहावयास मिळत आहेत. दोन - तीन महिण्यापूर्वी मोटरचे काम केले असताना पून्हा एकदा मोटरचे बिघडल्याचे कारण देऊन पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
सध्या नगरपंचायतीवर प्रशासकिय अधिकारी काम करीत असून मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने कर्मचार्यांवर कारभार अवलंबून आहे. वारंवार मोटर दुरुस्तीचे कारण पूढे केल्याने जनता संभ्रणात पडत असून मोटर दुरुस्तीच्या नावाखाली आर्थिक गणित दडलेय काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायती कडून पाणी पुरवठा कशामुळे खंडीत होत आहे याबाबत लोकांना कोणतीही कल्पना देण्यात येत नसून अचानक पाणी मिळणे बंद झाल्याने लोकांना पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर नगरपंचायतीकडून टॅकरद्वारे पाणी पुरवठा होणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. नगरपचायतीकडे टँकर असून त्याचा वापर होताना दिसत नाही तर खरेदी केलेला टँकर धुळ खात पडला आहे. नगरपंचायतीने जनतेच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी जनतेतुन करण्यात येत आहे