सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे येथे एका सभेत मी नेतृत्व करत असलेल्या कारखान्यात गतवार्षिच्या उसाला ३ हजार ३५० रुपये दर मिळणार असल्याची घोषणा केली. आणि सोमेश्वर व माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दोन्ही कारखान्याकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव तसेच इंदापूर तालुक्यातील छत्रपती हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालतात. छत्रपती कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. सद्या सोमेश्वर व माळेगाव हा कारखाना नेहमीच जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये ऊस दरात आघाडीवर राहिला आहे. त्यात सोमेश्वर व माळेगाव कारखान्यात उस गाळप व ऊस दराबाबत नेहमीच दोन्ही कारखान्यात रसीखेच लागलेली असते. त्यामुळे अजित पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे टनाला ३ हजार ३५० हा दर सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मिळणार की माळेगाव कारखान्याच्या सभासदांना मिळणार याबाबत सभासदांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
सोमेश्वर कारखान्याला गेल्या वर्षी तुटून गेलेल्या उसाला २ हजार ८४६ रुपये एफआरपी मिळाली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५४ रुपयांची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलेली घोषणा ही सोमेश्वर कारखान्यासाठी असेल तर सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना अजून टनाला ४५० रुपये मिळणार आहेत. तर माळेगाव कारखान्याच्या गेल्या वर्षीच्या उसाला २ हजार ८४९ रुपये एफआरपी बसली होती. माळेगाव च्या संचालकांनी यामध्ये टनाला २ रुपयांची भर घालून सभासदांच्या खात्यावर २ हजार ८५१ रुपये सभासदांच्या खात्यावर जमा केले होते. मात्र त्यानंतर माळेगाव कारखाना प्रशासनाने मध्यंतरीच्या काळात टनाला १०० रुपयांचे कांडे पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले होते. आतापर्यंत माळेगाव कारखान्याने सभासदांना २ हजार ९५१ रुपये अदा केले आहेत. जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा माळेगाव कारखान्याच्या सभासदांसाठी असेल तर माळेगावच्या सभासदांना टनाला ४०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
--------------------------
अजित दादांनी माझ्या नेतृत्वाखालील साखर कारखाना टनाला ३ हजार ३५० रुपये दर देणार असे वक्तव्य केल्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हाट्स अप स्टेट्सला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तो व्हिडिओ तसेच ३३५० रुपये दराचे स्टेट्स तसेच अनेकांनी आभार मानल्याचे स्टेट्स देखील ठेवले आहेत.
--------------------------------
पावसाअभावी ऊस लागवडी घटल्या
यावर्षी नीरा खोऱ्यात पडलेल्या कमी पावसामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल साडेपाच हजाराने उसाची लागवड घटली आहे. यावर्षी सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात ११ हजार ८०० एकरांवर आडसाली उसाची लागवड करण्यात आली आहे. तर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सहा हजार एकरांवर ऊस लागवड करण्यात आलेली आहे.
--------------------------
गतवर्षीच्या उसाला टनाला ३ हजार ३५० रुपये दर देण्याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसून याबाबत उद्या संचालक मंडळाची तातडीची बैठक याबाबत निर्णय घेणार आहोत.
पुरुषोत्तम जगताप
अध्यक्ष-सोमेश्वर कारखाना