सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील धानवली ता.भोर येथे शेतकरी तानाजी कोंडीबा धानवले हे घराशेजारी असणाऱ्या शेतात शेळ्या-मेंढ्या चारीत असताना दुपारच्या वेळी बिबट्याने बकऱ्यांच्या कळपात शिरून बोकडावर हल्ला करून फडशा पाडला.
स्थानिक जेष्ठ तसेच तरुणांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने बोकड सोडून धूम ठोकली असे पोलीस पाटील महिपती नथू धानवले यांनी सांगितले.
अनेक दिवसांपासून धानवली गावाच्या आसपास बिबट्याचा वावर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शुक्रवार दि-२३ घरी गणेश मूर्तीची पूजा असल्याने तानाजी धानवले यांनी घराशेजारीच शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या.यावेळी अचानक बिबट्या मेंढ्यांच्या कळपात शिरला.शेळ्या मेंढ्या चोहू बाजूकडे ओरडत पळू लागल्याचे पाहताच बिबट्याने बोकडावर हल्ला केल्याचे मेंढपाळाच्या लक्षात आले.तात्काळ तानाजी यांनी गावातील नागरिकांना जमा केले.यावेळी रामचंद्र धानवले, नथू धानवले,गणेश धानवले,लक्ष्मण धानवले,अंकुश पाकेरे, योगेश पाकेरे,सखाराम धानवले,प्रभाकर धानवले बिबट्याच्या तावडीतून बोकड सोडवण्याचा प्रयत्न केला.काही वेळात बिबट्या मृत बोकड सोडून पळून गेला.या घटनेत शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे.तर शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.