सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
आत्तापर्यंत मानववस्ती शेजारी बिबट्या येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला तसेच शेतात रान डुक्कर पिकांची नासधूस करण्याच्या घटना घडत होत्या. मात्र रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायरी ता.भोर गावात चक्क ४० ते ५० माकडांच्या कळपाने मागील दहा दिवसांपासून धुडगूस घातला असून खरिपातील उभ्या पिकांसह घरांचे मोठे नुकसान केले आहे.
माकडांची टोळकी शेतातील भात,नाचणी तसेच कडधान्य भुईमूग,घेवडा,सोयाबीन या पिकांमध्ये शिरून तर घरांवर नाचून(उड्या मारून) कौलांची तोडफोड करणे तसेच पत्रे खिडक्या,दरवाजे यांची मोडतोड करून नुकसान करीत आहेत.तर बऱ्याचदा ही माकडे घरात घुसण्याचेही धाडस करीत आहेत.तसेच नागरिकांच्या अंगावर धावून जान्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या जंगलातून आलेल्या माकडांच्या तोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.