सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जे देश प्रगत झाले त्यांचा प्रगतीचा पाया दर्जेदार शिक्षण हाच होता. आपल्याकडे मात्र शिक्षण दुय्यम राहिले असून त्याला पुरेसे बजेटदेखील दिले जात नाही. शिक्षकांच्या व पर्यवेक्षिय यंत्रणेच्या हजारो जागा रिक्त ठेवल्यात, माहित्या व उपक्रम यातच जाणीवपूर्वक शाळा अडकवून टाकल्यात. यामुळे सर्वसामान्य मुलांना एक प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण नाकारले जात आहे. अशात आता शिक्षकांनीच वज्रमूठ बांधून विद्यार्थी घडविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शिक्षणातून देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून समतेच्या मार्गाने चालणार विद्यार्थी तयार व्हायला हवा. देशाला जबाबदार नागरिक मिळायला हवा, असे मत भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे राज्य सचिव तथा पत्रकार संतोष शेंडकर यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता. बारामती येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अक्षय शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक आर. एन. शिंदे होते. यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव सतीश लकडे, पत्रकार महेश जगताप, प्रा. अच्युत शिंदे, प्रा. सुजाता भोईटे, डॉ. जया कदम, डॉ. जगन्नाथ साळवे, सुनिल निंबाळकर उपस्थित होते.
शिक्षण व्यवस्थेमध्ये आंतर्बाह्य बदल होत आहेत. काळाची गरज ओळखून शिक्षकांनी सतत स्वतःला अपडेट केले पाहिजे. जगाच्या बजारपेठेत विद्यार्थी सक्षपणे उभा रहावा यासाठी त्याला त्याच्या आवडीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे, असे मत प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी व्यक्त केले.
तसेच शिक्षकदिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालय बारावीतील विद्यार्थ्यांनी तर वरीष्ठ महाविद्यालय पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच शिक्षक बनून एक दिवस चालविले आणि शिक्षक बनून तासिकाही घेतल्या. याचे संचलन करणाऱ्या नवशिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. अर्चना शेडगे, प्रा. रवींद्र होळकर, शिवराज गर्जे, पूर्वा देशपांडे, मधुरा टिके, विशाखा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. राजगौरी घाडगे व अहिल्या ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले तर शीतल करे हिने आभार मानले.
--
COMMENTS