पुरंदर ! विजय लकडे ! पारा ३१ अंशावर....अतिउष्णतेने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात : कोंबड्यांनी माना टाकल्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
नीरा : विजय लकडे
पावसाळ्यातील जून, जुलै, ऑगस्ट व आता सप्टेंबरचा पहिला आठवडा गेला तरी पावसाने ओढ दिल्याने वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पोल्ट्री व्यवसाय आता अडचणीत येत आहे. पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागात बुधवारी ३१ डिग्री तापमान झाल्याने अति उष्णतेने पोल्ट्रीतील मरतुकीचे प्रमाण वाढले आहे  कोंबड्यांनी माना टाकल्याने पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहेत. 

     अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसावर होऊ लागला आहे. अतिउष्णतेमुळे कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी व्यवसायिकांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा खर्चही वाढलेला आहे. 

      वातावरणात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम शेतीवरही जाणवू लागला आहे. वारंवार पिकांना पाणी देऊनही पिके सुकू लागल्याचे चित्र दिसत आहे. पोल्ट्रीमधील पक्षांना अतिउष्णतेने त्रास होत असल्याने शेतकरी पोल्ट्रीमध्ये फॅन बसवत आहेत; तर पक्ष्यांना ओला थंडावा मिळावा म्हणून बारदान पोती, उसाचा पालापाचोळा ओला करून पत्रा शेडवर टाकला जात आहे. पाण्याच्या पाईपने वारंवार शेडवर पाणी फवारावे लागत आहे. उष्णतेमुळे पक्ष्याची मर वाढली आहे. वजनही घटत आहे. 

       मागील आठ दिवसात प्रचंड ऊन आणि सायंकाळी पावसाचे वातावरण, असे चित्र असते. तुलनेत दिवसा सकाळी ८ पासून ते दुपारी ४ पर्यंत फार कडकडीत ऊन पडते. यामुळे तापमानात झालेली वाढ ही प्राणी, पक्षी व शेतातील पिकांना हानिकारक ठरत आहे. पोल्ट्रीतील पिल्ले फार नाजूक असतात. त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे दिवसभर पोल्ट्रीमध्ये सतत फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे. हा खर्च वाढत असून, पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. 

       बारामती व पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, जगतापवस्ती, निंबुत परिसरात पोल्ट्री व्यवसायात मोठ्या संख्येने आहेत. अतिउष्णतेमुळे पक्ष्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पक्ष्यांचे खाद्य महागले आहे. वैद्यकीय उपचार करावे लागत आहेत. कोंबड्या उष्णतेने कमी खाद्य खातात. परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. त्यामुळे त्यांच्या आजारावर अधिक परिणाम होतो, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली. 
--------------------------------
      "अतिउष्णता पक्ष्यांना हानिकारक असते. कोंबड्या मरण्याचे प्रमाण वाढते. त्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्रीवर शॉवर बसवणे, फॅन लावणे, उसाचा पाला टाकून सतत पाणी मारणे, अशा उपाययोजना करण्यात येतात. परिणामी पोल्ट्री व्यवसाय सध्या अडचणीत आहे." 

सचिन फरांदे : , निंबुत
संतोष सूर्यवंशी : निंबुत
नवनाथ फरांदे : निंबुत
शेखर लकडे : निंबुत
विशाखा जगताप : वाणेवाडी-मळशी
-----------------पोल्ट्री व्यावसायिक
To Top