सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
निरा ता, पुरंदर येथे नेहमीच हिंदू मुस्लिम समाजाचा एकोपा आपणास दिसून आलेला आहे. मुस्लिम समाजाच्या सणांमध्ये हिंदू बांधव आणि हिंदू समाजाच्या सणांमध्ये मुस्लिम बांधव नेहमीच हिरीरीने आपला सहभाग नोंदवतात.
पुरंदर तालुक्यातील निरा वार्ड नंबर पाच मध्ये श्रीदत्त सेवा मंडळ तक्रारवाडी या मंडळाचे असलम सय्यद मुलानी (गोंडा भाई) हे सभासद असून हे आपली पत्नी आसमा मुलानी मुलगा अहद व मुलगी आहना यांच्यासमवेत गेली सहा वर्षे गणपती बाप्पांची मनोभावे कुटुंबासहित सेवा करतात अगदी मंडळाची गणपतीची मूर्ती देखील हे कुटुंब स्वखर्चाने आणते मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ते गणपती विसर्जन होईपर्यंत हे कुटुंब मंडळाचे अध्यक्ष सुदाम बंडगर व रणवीर खरात यांच्या समवेत बाप्पाची पूजाअर्चा मोठ्या भक्तीमय वातावरणात गेली सहा वर्षे झाले करत आहेत. आणि इथून पुढेही करत राहणार आहे असे 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले
वार्ड नंबर सहा मध्ये अश्फाक शेख हे मुस्लिम समाजाचे युवक भैरवनाथ तरुण मंडळाचे सदस्य असून गेली 15 वर्षे झाली ते या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा अध्यक्ष संतोष मोहिते गणेश वाघमारे अनंता शिंदे व निरंजन ननवरे यांच्या समवेत करतात.
अशा या तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या निरेमध्ये नेहमीच आपणास हिंदू मुस्लिम समाजाचा एकोपा पहावयास मिळतो मुस्लिम बांधव गणपती उत्सवामध्ये आपला सहभाग घेऊन बाप्पाची मनोभावे सेवा करतात. निरे मध्ये हिंदू मुस्लिम समाजाचा कुठलाही सण असो दोन्ही समाज एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.
COMMENTS