सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे परिसरातील समाज बांधवांनी एकत्र येत मराठा समाजाला न्याय हक्क मिळावा या मागणीसाठी व मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा निषेध करण्यासाठी पायी रॅली काढण्यात आली. नीरा-बारामती रस्त्यावर ठिय्या आंदोलनही केले. चौधरवाडी येथेही लाठीमाराबद्दल निषेध सभा घेण्यात आली. याशिवाय निंबुत, करंजेपूल, वाणेवाडी, मुरूम येथील व्यापारी पेठांनी बंद पाळला.
मराठा आरक्षण आंदोलनास व बारामती बंदला पाठींबा देण्यासाठी वाड्यावस्तीवरील तरूण व ज्येष्ठ नागरिक आज सकाळी करंजेपील या व्यापारी पेठेतील मुख्य चौकामध्ये जमा झाले. करंजेपूलसह सोरटेवाडी, वाणेवाडी, निंबुत, मुरूम, चौधरवाडी, करंजे येथेही बराच काळ दुकाने बंद ठेवण्यात आली. करंजेपूल चौकात जमलेल्या लोकांनी सोमेश्वर कारखान्यापर्यंत रॅली काढून तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. पुन्हा रॅली करंजेपूल चौकात आणण्यात आली. या ठिकाणी नीरा-बारामती रस्त्यावर काही काळासाठी ठीय्या मारण्यात आला. याप्रसंगी 'सोमेश्वर'चे माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, उद्योजक संतोष कोंढाळकर, माजी सरपंच वैभव गायकवाड, माजी संचलाक विशाल गायकवाड, करंजेपुल चे माजी उपसरपंच निलेश गायकवाड, मुरूमचे माजी सरपंच प्रदीप कणसे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी शिंदे, भाजपचे कार्यकर्ते हनुमंत शेंडकर, भाऊसाहेब हुंबरे, सुहास गायकवाड, डॉ मनोहर जगताप उपस्थित होते.
प्रास्ताविक व्यक्त करताना सोमेश्वरचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी, लाठीमार प्रकरणाचा जाहीर निषेध करत आहोत. सदर प्रकरणाची चौकशी करून मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. मराठा समाजात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आले असून त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आता पुढाकार घेऊन समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. शिवाजी शेंडकर यांनी आभार मानले. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व उपनिरीक्षक योगेश शेलार यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
सभेनंतर अचानक उपस्थित राहिलेल्या दोन व्यक्तींनी येथील तरूणांना एकत्र करत गाणी म्हणायला लावून माथी भडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणांनी त्याना कुठलीही दाद दिली नाही त्यामुळे एक कडवे ऐकताच तरूण पांगायला सुरवात झाली. संबंधित व्यक्तीनेही प्रतिसाद नसल्याचे काढता पाय घेतला. दरम्यान, चौधरवाडी येथेही सुखदेव शिंदे याच्या पुढाकाराने निषेध सभा पार पडली. याप्रसंगी माजी सरपंच यादवराव शिंदे, संपत पवार, सोमनाथ देशमुख, महेंद्र पवार, देशराज पवार, विशाल पवार उपस्थित होते.