सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराच्या विरोधात बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा समाजातील आंदोलकांनी "सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारमधून बाहेर पडा" अशा घोषणा देत अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला असून राज्यभर ठीक ठिकाणी बंद पाळण्यात आला. बारामतीत देखील बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चेकरी बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून भिगवन चौकात पोहोचले. या ठिकाणी हुतात्मा स्तंभाजवळ मोर्चेकरांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याशिवाय अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडा, असे आवाहन देखील करण्यात आले.