बाईपण भारी देवा....! राज्याच्या राजकारणात काहीही घडो आमच्यासाठी पवार कुटुंबीय एकच : गौरी स्थापनेद्वारे बारामतीकर महिलांचा अनोखा संदेश !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात काहीही घडो पण आमच्यासाठी पवार कुटुंबीय एकच! अशा भावना करंजेपूल येथील संगीता आळंदीकर व ऐश्वर्या आळंदीकर या सासु-सुनांनी गौराया स्थापनेच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. त्यांनी 'बाई पण भारी देवा' अशी थीम राबवताना खासदार सुप्रिया, सुळे, सुनेत्रा पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार यांना 'बारामतीचा अभिमान' या नावाखाली गौरायांमध्ये अभिमानास्पद स्थान एकत्रितपणे दिले आहे. यातून एका अर्थाने राजकीय वारे कुठेही फिरो पवार फॅमिली एकत्रच असा संदेशच जणू दिला आहे.
           सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बारामतीकडे सरकला आहे. समाज माध्यमांमध्ये ही बारामतीत नेमकी काय चालले आहे ? अशी चर्चा सुरू आहे याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्षात पडलेली फुट! माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विरोधात आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सत्तेत दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून मीडियातून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली की पवार कुटुंबीयात? अशीही चर्चा होत आहे. महाराष्ट्रातल्या माणसाला बारामतीत काय चालले आहे किंवा बारामतीच्या पवारांच्या हक्काच्या मतदारसंघातील लोकांच्या काय भावना आहेत? याची उत्सुकता लागली आहे नेमक्या याच भावना आता गौरी गणपती स्थापनेतूनही समोर आले आहे.
         करंजेपूल येथील संगीता आळंदीकर व ऐश्वर्या आळंदीकर या सासु सुनांनी गौराई यांची स्थापना करताना बाई पण भारी देवा अशी थीम घेतली आहे. या थीम मधून जिजाऊ सावित्री अहिल्या यांच्यापासून इंदिरा गांधींपर्यंत कार्याचा आढावा घेतला आहे. आणि यात विशेष म्हणजे बारामतीचा अभिमान या नावाखाली खासदार सुप्रियाताई सुळे, हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार आणि शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार या चारही कर्तुत्वान महिलांना गौरायांसोबत स्थान दिले आहे. राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांचे गट जरी राजकीय दृष्ट्या सध्या वेगळे दिसत असले तरी बारामतीकरांच्या दृष्टीने पवार कुटुंबीय एकच आहेत अभेद्य आहेत हेच यातून प्रकट केले आहे. पवार कुटुंबीयात कर्तृत्व असलेल्या चारही महिलांचा यामुळेच गौरायाच्या निमित्ताने एकत्रित आढावा घेण्याचे कौशल्य आळंदीकर सासु सुनांनी प्रकट केले असावे.
 याबाबत संगीता आळंदीकर म्हणाल्या, माध्यमामधून काय चर्चा होते राजकारणात काय चालले आहे याचे आम्हाला देणेघेणे नाही. आमचे तीन पिढ्या पवार कुटुंबीयांशी संबंध आहेत आणि सगळे पवार कुटुंबीय आमच्यासाठी एकच आहे आणि खरोखरच पवार कुटुंबातील पुरुषांप्रमाणे महिला देखील कर्तुत्ववानच आहेत.
To Top