सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिऐशन ऑफ इंडिया'तर्फे 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'च्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राजेंद्र चांदगुडे यांना 'जीवनगौरव पुरस्कारा'ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या ६८ व्या वार्षिक सभेमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एम. के. पटेल (गुजरात), उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, कार्यकारी सचिव गौरी पवार, व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, एनएसआयचे संचालक नरेंद्र मोहन, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयंत नाईकनवरे आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.
राजेंद्र चांदगुडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवीधर यांत्रिक अभियंता, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून साखर अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर या संस्थेतील चार्टर्ड इंजिनियर आणि महाराष्ट्र शासनाचे प्रथम वर्ग बॉयलर अभियंता आहेत.
साखर आणि संबंधित उद्योगाच्या विकासात मागील 28 वर्ष त्यांचे भरीव योगदान लाभले आहे. ते सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांची साखर उद्योगात एक सुप्रसिद्ध अभियंता, संशोधक, लेखक आणि जगभरातील नामांकित साखर कारखान्यात सल्लागार म्हणून वेगळी ओळख आहे.
चांदगुडे हे साखर कारखान्यांची तांत्रिक कार्यक्षमता आणि क्षमता वापर यात सातत्यानं सुधारणा व्हावी, याबाबत 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'च्या साखर अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन करतात. कारखान्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वीकारून तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत राहावे, अशी त्यांची भूमिका असते.
साखर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तसेच कारखान्यांचे मिल बंद प्रमाण कमी करणे, गाळप हंगाम बंद काळात यंत्र सामग्रीची कार्यक्षम दुरुस्ती आणि चालू हंगामात प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीबाबत ते नेहमी मार्गदर्शन साखर कारखान्यात करतात.
साखर उतारा जास्तीत जास्त कसा राहील, कारखाना चालवताना लागणारी वाफ, पाणी आणि विजेची बचत कशी होईल, याबाबत कोणते तांत्रिक बदल कारावेत, कोणती यंत्रसामग्री वापरावी याबाबतचा सल्ला आणि सेवा देण्याचे काम ते कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन करत असतात.
साखर कारखान्यांना अधिकचे उत्पन्न मिळण्यासाठी भुशावर आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे, उभारणीच्या कामात सल्ला देण्याचे तसेच प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज निर्मिती होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्षम यंत्रसामग्री बसवून ऊर्जा बचत करण्यासाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध जर्नल्समध्ये ३० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कौशल्य आणि प्रावीण्यावर आधारित पुस्तक लिहिले आहे. साखर उद्योगात त्यांना अनेक प्रतिष्ठित संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी अर्जेंटिना, इजिप्त, घाना, इथियोपिया, इराण, झेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, इंडोनेशिया, फिजी बेटे, मॉरिशस, जपान, थायलंड आणि अधिक देशांना संशोधन शोध निबंध सादरीकरण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी भेटी दिल्या आहेत.
'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिऐशन ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना सन १९३६ मध्ये झाली. या संस्थेचे २,२०० पेक्षा अधिक सदस्य असून त्यापैकी बरेच सदस्य साखर उद्योगाशी संबंधित आहेत. तसेच ते विविध तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयातील प्रसिद्ध तज्ज्ञ आहेत.
COMMENTS