फलटण ! ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात अग्रेसर असणाऱ्या 'सोमेश्वर'चे आता एकच लक्ष...एकरी १०० टन ऊसाचे उत्पादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस विकास व शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी लक्ष्य एकरी १०० टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयावर प्रशिक्षण कार्यक्रम दि. १३ सप्टेंबर, २०२३ रोजी संपन्न झाला. 
          दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड  उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे बापूराव गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना पाडेगाव संशोधन केंद्राशी असलेला श्री सोमेश्वर स.सा.कारखान्या बरोबर असलेला ऋणानुबंध असाच वाढत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वी सोमेश्वर कारखाना चालविण्यासाठी गेट केनद्वारे इतर कार्य क्षेत्रातील ऊस उपलब्ध करावा लागत होता. परंतू पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेला फुले २६५ या वाणामुळे कारखाना गाळपामध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८० टक्के पेक्षा जास्त ऊस क्षेत्रावर उभा असून या वाणामुळे साखर कारखाना ऊस व साखर उत्पादनात पुणे जिल्हयामध्ये अग्रेसर आहे. सदर वाण चोपण जमिनीत चांगला येत असल्यामुळे व एकरी जास्त उत्पादन मिळत असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी प्रशिक्षणार्थीना माहीती देताना ऊसाच्या एकरी १०० टन ऊस उत्पादन व अधिक साखर उतारा देणाऱ्या नवीन सुधारीत वाणांचा विकास करणे तसेच उत्पादन तंत्रज्ञान यावर पाडेगाव येथील संशोधन केंद्रामध्ये प्रामुख्याने भर दिला जात असल्याचे सांगीतले. या संशोधन केंद्राने १६ वाण आणि १०८ ऊस उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील एकूण लागवडी खालील क्षेत्रापैकी सुमारे ८७ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेले वाण फुले २६५ व को- ८६०३२ या दोन वाणांचा प्रमुख वाटा असल्याची माहीती उपस्थितांना दिली.
प्रशिक्षण कार्यक्रमात सकाळच्या तांत्रिक सत्रात एकरी १०० टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान, हंगामनिहाय ऊसाचे नवीन वाण व तोडणी नियोजन, ऊस पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व संजीवकांचा वापर, ऊस पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन, ऊस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन, ऊस बिजोत्पादन व फुले सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान, खोडवा व्यवस्थापन अशा एकूण ७ तांत्रिक विषयावर पाडेगावच्या शास्त्रज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच दुपारच्या तांत्रिक सत्रात प्रक्षेत्र भेटीमध्ये ऊसाचे नवीन वाण व संशोधन केंद्रात राबविलेले विविध संशोधन प्रयोगांची सखोल माहिती शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणार्थींना दिली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस विकास व शेतकी विभागातील एकूण १०० अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी ऊस पिकाविषयी मार्गदर्शीकेचे अनावरण करून सर्व प्रशिक्षणार्थीना पाडेगाव केंद्राचे प्रमुख आणि मुख्य शेतकी अधिकारी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शीकेचे वाटप करण्यात आले. पाडेगावचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ डॉ. सुरज नलावडे, ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. शालीग्राम गांगुर्डे, ऊस किटकशास्त्रज्ञ, डॉ. कैलास भोईटे, ऊस पैदासकार, डॉ. सुरेश उबाळे, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. किरणकुमार ओंबासे आणि डॉ. माधवी शेळके यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ऊस विकास विभागातील विराज निंबाळकर आणि प्रविण निगडे व शेतकी विभागातील सतीश काकडे व शशिकांत खलाटे यांनी मनोगत व्यक्त करताना कारखान्यातील शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऊस प्रशिक्षणाची गरज निश्चितच होती आणि भविष्यात अशा पध्दतीचे प्रशिक्षण कार्यक्रम पाडेगाव संशोधन केंद्राने आयोजीत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
       या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन जिल्हा विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. सुरज नलावडे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुरेश उबाळे यांनी केले.
To Top