सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने गेल्या सात वर्षात सरासरीने टनाला ३१०० रुपये दर दिला आहे. सोमेश्वरची ऊसदराची स्पर्धा इतर कारखान्यांशी नसून स्वतःशीच आहे. कारखाना दिवाळीला सभासदांना टनाला ४५० रुपये देणे असून संचालक मंडळाच्या मासिक सभेत ठरल्याप्रमाणे भाग विकास निधीपोटी टनाला २० रुपये कपात करून उर्वरित ४३० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
वाणेवाडी ता.बारामती येथे सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या ऊसाला टनाला ३३५० रुपये दर दिल्याबद्दल वाणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने संचालक मंडळाच्या सत्कार समारंभात जगताप बोलत होते.
उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, ऋषीकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, रणजित मोरे, हरिभाऊ भोंडवे, प्रवीण कांबळे, किसन तांबे, विश्वास जगताप, जेष्ठ नेते रघुनाथ भोसले, कामगार नेते तुकाराम जगताप, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, सुनील भोसले, विक्रम भोसले, डॉ. रवींद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शेजारील तालुक्यातील आमदारांच्या सहकार्याने कारखान्याची वाटचाल सुरू आहे. आता राज्यात सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीने खाजगी कारखाने झाले आहेत. मात्र एकीकडे खाजगीला मोकळीक तर सहकारी साखर कारखान्यांवर नियम व बंधने लादली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सद्या कारखान्याच्या कार्यकक्षेत्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता पंधरा लाख टन होणारे ऊसाचे गाळप बारा ते साडेबारा लाख टन अंदाज आहे. कारखान्यांची गाळप क्षमता वाढली असली तर मात्र उसाचे क्षेत्र त्या प्रमाणात वाढले नाही. त्यामुळे आपण पिकवलेला कष्टाचा ऊस इतर कारखान्याला देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. तसेच कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामधून ४९ कोटी रुपयांचा नफा झाला असून गेल्या हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून वीज प्रकल्पाचे विस्तारीकरण काम सुरू आहे. लवकरच डिस्टलरीच्या विस्तारीकरणाबाबत सभासदांची परवानगी घेऊन काम सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात संचालक सुनील भगत, ऋषी गायकवाड, सुनील भोसले, गोविंदमहाराज चव्हाण, उत्तमराव चव्हाण, डॉ. रवींद्र सावंत, भाऊसाहेब भोसले, तुकाराम जगताप यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जगताप यांनी केले. सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी तर आभार चंद्रशेखर जगताप यांनी मानले.