बारामती ! सहकार कायद्यानुसार पतसंस्थांच्या कारभार चालतो : राजवर्धन शिंदे l 'अजयश्री'कडून पाच टक्के लाभांश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : सुनील निंबाळकर
पतसंस्थांकडून मोठ्या स्वरूपाची तारण कर्ज दिली जातात. तारणी कर्जामुळे कर्ज सुरक्षित राहते मात्र मुदतीत कर्जफेड होत नसल्यामुळे पतसंस्था कायदेशीर कारवाई करतात. सभासद कर्ज थकवण्याच्या अथवा बुडविण्याच्या उद्देशाने पतसंस्थांविरोधात न्यायालयात दावा दाखल करतात मात्र सहकारी संस्थेचा कारभार हा सहकारी कायद्याने चालतो त्यामुळे दाव्यांचा निकाल संस्थेसारखा होतो. न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च थकीत कर्जदार सभासदांकडून वसूल केला जातो त्यामुळे सभासदांचे आर्थिक नुकसान होते पर्यायाने सभासद व संस्थेच्या हितास बाधा निर्माण होते. यासाठी पतसंस्थेच्या सर्व कर्जदारांनी वेळेत कर्ज फेडावे असे आवाहन अजयश्री पतसंस्थेत संस्थापक व सोमेश्वर कारखान्याचे जेष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांनी केले.
             मुरूम(ता. बारामती) येथील अजयश्री पतसंस्थेची तिसावी वार्षिक सभा रविवारी दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी पतसंस्थेच्या अजयश्री मल्टीपर्पज हॉल येथे पार पडली. त्यावेळी राजवर्धन शिंदे बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन माऊली कदम, व्हाईस चेअरमन बापूराव बारावकर, सोमेश्वरचे माजी संचालक कुमारभाऊ शिंदे, फत्तेसिंग जगताप, अविनाश चव्हाण, सुहास चव्हाण, मधुकर फरांदे, सरपंच नंदकुमार शिंगटे, माजी सरपंच प्रदीप कणसे, उद्योजक दीपक साखरे, सोसायटीचे चेअरमन विकास जगताप,  युवराज शिंदे, महेश शिंदे, डॉ. राहुल शिंगटे,  शहाजी शिंदे, दादा भिलारे, संचालक आबुशा इनामदार, दीपक शिंदे, राजेंद्र भिसे, विठ्ठल भंडलकर व कर्मचारी उपस्थित होते. खेळीमेळीत वार्षिक सभा पार पडली. अजयश्री पतसंस्थेला ऑडिट वर्ग 'ब' मिळाला आहे. पतसंस्थेचे 1473 सभासद असून, वसूल भागभांडवल 4  कोटी 18 लाख आहे. ठेवी 35 कोटी 2 लाख आहेत, तर पतसंस्थेने 31 कोटी 51 लाख कर्ज वाटप केले आहे. चालू वर्षात पतसंस्थेला 31 लाख 21 हजार नफा झाला आहे. पतसंस्थेने सभासदांसाठी चालू वर्षात पाच टक्के लाभांश जाहीर केला आहे, असे सचिव पुरुषोत्तमदास बोत्रे यांनी सांगितले. स्वागत चेअरमन माऊली कदम यांनी केले. आभार उपाध्यक्ष बापूराव बारवकर यांनी मानले. 
To Top