सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील निरा देवघर प्रकल्पग्रस्त शेतक-याचा मोबदला न दिल्यामुळे पुण्यातील लघुवाद न्यायालयाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची खूर्ची जप्त केली.
पुण्याचे अतिरिक्त लघुवाद न्यायाधीश आर जे तांबे यांच्या आदेशानुसार बेलीप बी एन सूर्यवंशी आणि ए ए चौधरी यांनी बुधवारी (ता.१८) दुपारी ही कारवाई केली. न्यायालयाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने फिर्यादी शेतक-याला ६ लाख २७ हजार ८७१ रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश देवून चार वर्षे झाली तरीही महामंडळाने शेतक-यांना मोबदल्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे न्यायालयाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार १९९६ च्या सुमारास दापकेघर (ता.भोर) येथील शेतकरी धोंडीबा दगडू पावगे व सिताराम दगडू पावगे यांची जमीन, घर व पिठाची गिरणी निरा देवघर धरण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. त्याचा मोबदला कमी मिळाल्यामुळे सिताराम दगडू पावगे यांनी १९९८ ला न्यायालयात दावा दाखल केला.
सदर दाव्याचा निकाल तब्बल १० वर्षांनी म्हणजे २०१८ साली लागला. त्यामध्ये तक्रारदार पावगे यांना महामंडळाने ६ लाख २७ हजार ८७१ रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही महामंडळाने संबंधीत शेतक-याला मोबदल्याचे पैसे दिले नाहीत.त्यामुळे न्यायालयाने महामंडळाच्या जप्तीचे आदेश जारी केले. त्यानुसार न्यायालयातील बेलीप बी एन सूर्यवंशी आणि ए ए चौधरी यांनी बुधवारी दुपारी पुण्यातील सिंचन भवन येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याशी चर्चा केली. परंतु महामंडळाकडून शेतक-यांना कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन देण्यास नकार देण्यात आला.त्यामुळे बेलिप यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावनी करून महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांची खूर्ची जप्त केली. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी बाळासाहेब पावगे, नंदकुमार देशपांडे व पंढरीनाथ पावगे उपस्थित होते. न्यायालयात फिर्यादीच्या वतीने अॅड पल्लवी पोतनीस यांनी काम पाहिले.
COMMENTS