सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
किशोरवयात, तारूण्यात पाऊल ठेवताना प्रत्येकामध्ये शारीरिक, मानसिक बदल होतच असतात. शिकण्याचे, घडण्याचे वय आणि भाव-भावना उमलण्याचे वय एकच असते. या काळात मनाने कमी आणि मेंदूने जास्त विचार करावा. भावनांचं समायोजन करता आलं पाहिजे आणि स्वतःला सावरून ध्येयाकडे जाता आलं पाहिजे, अशा शब्दात मानसशास्ज्ञाच्या अभ्यासक डॉ. गीतांजली जाधव-चव्हाण यांनी सल्ला दिला.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शालेय वयातील विद्यार्थिनींसाठी प्राचार्य पी. बी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'कळी उमलताना' या विषयावर डॉ. चव्हाण बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका विजया शिर्के होत्या. याप्रसंगी प्रतिभा जोशी, सुजाता जगताप, स्नेहल माहूरकर, वर्षा कदम, शोभा धुमाळ उपस्थित होत्या.
मुला-मुलींमध्ये शालेय वयात खेळकरपणा, निखळ मैत्री असणे आवश्यक आहे. सह शिक्षण नेहमीच मानसिकदृष्ट्या उपयुक्त ठरते. आताचा काळ वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया आला आहे. त्यामुळे त्यांच्याशी शिक्षक, पालक यांनी अधिकाधिक संवाद करत राहण्याची आवश्यकता आहे. सोशल मिडियातील माहितीवर त्यांनी विसंबून राहणे धोक्याचे आहे. त्या माहित्या विद्यार्थ्यांनीही तपासून पाहिल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी शालेय वयात अभ्यास, ज्ञानग्रहण करणे, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे, खेळ खेळणे, चौरस आहार घेणे आवश्यक आहे. काही अनुचित प्रकार घडत असल्यास आवर्जून आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने बोलावे किंवा आपल्या शिक्षकांशी किंवा दादा-ताईशी बोलावे. टोकाचे निर्णय घेऊ नयेत. रूढी परंपरांना प्रश्न विचारा आणि वैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवावा. कार्यक्रमामध्ये विद्या केंगार व जागृती सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राणी शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मनिषा खोमणे यांनी मानले.
--