बारामती ! लोकसहभाग असेल तर सरकारी शाळा वाढतील टिकतील : दत्तात्रय वारे गुरुजी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 शाळा विकासाचा लोकसहभाग हाच गाभा आहे. सरकारी शाळा टिकवणे वाढवणे हे काम लोकसहभागच करू शकतो. शाळा फक्त पैशाने आणि सत्तेने मोठ्या होत नाहीत. लोकांचा संपर्क असला की शाळा उभारणी होते. शाळा ही समाजशाळा बनावी. तिथं फक्त मुलचं नाही तर समाज घडतो. आणि शिक्षकांनीही स्वतःच्या आनंदासाठी काम करावं आणि जिथं काम करतो ती जागा सुंदर असावी यासाठी परिश्रम घ्यावेत. मुलांना विचारून काम करावं, असे आवाहन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त गुरुजी दत्तात्रय वारे यांनी केले. 

             सोमेश्वरनगर ता. बारामती येथील सोमेश्वर इंजिनीरिंग कॉलेजच्या आवारात भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या वतीने ८९ व्या 'ज्ञान विज्ञान गप्पा' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य एस. डी. जगताप होते. याप्रसंगी भारत खोमणे, बाळकृष्ण भापकर, केशव जाधव, एकनाथ खैरे, संदीप जगताप, भीमराव बनसोडे, ह. मा. जगताप, मदन काकडे, दीपक काकडे, टी. के. जगताप, सोमनाथ सोरटे, डॉ. प्रशांत साळवे, योगेंद्र माने, कृष्णा कुदळे, शरद मचाले, सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते. यानिमित्ताने परिसरातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या शंभूराजे सोरटे, तुकाराम सोरटे, आशिष बालगुडे यांचा तर गुणवंत शिक्षक पुरस्काराबद्दल सविता वाबळे यांचा सन्मान करण्यात आला. वारे यांनी, आपण शिकवतो त्या पोरांचं कल्याण पंधरा वर्षांनी होणार असते पण आपला फायदा त्याच रात्री शांत झोप मिळाल्याने होतो. आपण पैसे जोडायचा नाही, माणसं जोडायची पोरं उभी करायची. आपण कपडे नव्हे विचार बदलायचा, असे आवाहन शिक्षकांना केले. शिक्षण हा समाजाच्या अखत्यारीतला विषय आहे सरकारच्या नव्हे. लोकांच्या अखत्यारीत शिक्षण आल्याने आमचे प्रश्न कमी झाले. लोकं कामाची दखल घेतात तेंव्हा आपलं बरोबर चाललंय असं समजावं. अधिक वेळ विद्यार्थ्यांना द्यावा. आम्ही अति नाही दिला पण जादा वेळ मुलांना दिला. हा कामाचा संघर्षच आपल्याला संघर्षात वाचवतो, असे वारे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नौशाद बागवान यांनी केले राजू बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले विकास सावंत यांनी आभार मानले. 

To Top