सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेजारचे अन्य कारखाने महिन्यास 'प्रतिसभासद' पाच किलो साखर देतात पण 'सोमेश्वर'ने सभासदांच्या मागणीवरून 'प्रतिशेअर्स' पाच किलो साखर दिली आहे. त्यामुळे शेजारी कारखान्यांच्या तुलनेत सोमेश्वर सभासदांना अधिकची साखर देत आहे. आता दिवाळीसाठी प्रतिसभासद दहा किलो साखर अतिरिक्त देणार आहोत. पण सभासदांच्या आग्रहावरून दहा ऐवजी तीस किलो दिली तर शासनास जादा प्राप्तिकर भरावा लागेल आणि त्यामुळे ऊस दरात प्रतिटन सुमारे 25 रुपयांचे नुकसान होईल, असे स्पष्टीकरण सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिले.
येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने दिवाळीस तीसऐवजी दहा किलो साखर देण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा झडत आहे.
याबाबत जगताप म्हणाले, माळेगाव व छत्रपती प्रतिसभासद 5 किलो साखर महिन्याला देतात. तर दिवळीस अनुक्रमे 10 व 15 किलो बोनस साखर देतात. साखरेस माळेगाव साडेतेरा तर छत्रपती एकवीस रुपये प्रतिकिलो दर घेतो. सोमेश्वर सभासदाला नव्हे तर प्रत्येक शेअर्सला 5 किलो आणि दिवाळीला 10 किलो साखर 14 रुपये 28 पैसे (जीएसटीसह 15 रुपये) दराने साखर देतो. त्यामुळे सोमेश्वरकडे सभासदांना अधिक झुकते माप आहे. दरम्यान, सोमेश्वरच्या 2022 च्या वार्षिक सभेत सभासदांच्या मागणीवरून प्रति सभासद याऐवजी प्रतिशेअर्स महिन्याला पाच किलो साखर देण्याचा निर्णय घेतला. तसेच दिवाळीसाठी बोनस म्हणून दहा किलोचा निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी 2022 च्या दिवाळीपर्यंत आपण प्रतिसभासद पाच किलो आणि दिवाळीसाठी तीस किलो साखर देत होतो. त्यावेळी 27000 सभासद व 3000 शेअर मागणीदार याना मिळून 27 हजार 689 क्विंटल साखर दिली जात होती. त्यानंतर आता एप्रिल 2023 पासून प्रतिशेअर्स पाच किलो व दिवाळीस प्रतिसभासद दहा किलो याप्रमाणे साखर देत आहोत. सध्या सभासद व शेअर मागणीदार 30 हजार 766 असले तरी त्यांचे आता 49 हजार 489 शेअर्स आहेत. त्यामुळे 32 हजार 770 क्विंटल साखर द्यावी लागणार आहे. म्हणजेच नव्या सूत्राने 5 हजार क्विंटल साखर जादा अदा करत आहोत. विरोधक मात्र गेटकेन पण आणू नका, साखर पण जादा पाहिजे आणि भाव पण जादा पाहिजे असे दोन्ही बाजूंनी बोलतात अशी टीकाही जगताप यांनी केली. तसेच दिवाळीची साखर हा बोनस असतो. ऊस आला, न आला तरीही आणि शेअर मागणीदार असो वा सभासद त्यांनाही ती द्यावी लागते.
-------------------------
प्रतिटन सुमारे 25 रुपये नुकसान
शासन नियमानुसार प्रतिमहा पाच किलो साखर देण्यास मान्यता आहे. त्यापेक्षा अधिक साखर दिली तर तीस टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. सध्या 34 रुपये प्रतिकिलो दर असून कारखाना सभासदांना 14.28 रुपये दराने साखर देतो. वरच्या 19 रुपये 72 पैसे या सवलतीवर 30 टक्के प्राप्तिकर लागू होतो. जर दिवाळीसाठी 10 किलोऐवजी 30 किलो साखर दिली तर प्राप्तिकराची खूप जास्त आकारणी होऊ शकते. त्यामुळे सभासदांचे प्रतिटन सुमारे 25 रुपयांचे नुकसान होऊ शकते. जे पैसे भावात मिळू शकतील ते सरकारकडे वर्ग होतील.
---
COMMENTS