सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
शिवरी (ता. पुरंदर) येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत एक बैलगाडा विहिरीत पडून एक बैल मृत झाला. इतर दोन बैल जखमी झाले होते, तर बैलगाडा चालक, एक प्रेक्षक जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या आयोजकावर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १२ ऑक्टोबर रोजी शिवरी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धीरज भांडवलकर (रा. सासवड) यांचा बैलगाडा शर्यतीत पळत होता. शर्यतीचे क्रॉस लाईन संपल्यानंतर हा बैलगाडा तेवढ्याच वेगाने पुढे पळत गेला. चालक अप्पा कारुंडे यांनी गाडा थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती न थांबता पुढे पळत राहिला. चालक गाड्यातून खाली पडून जखमी झाला आहे. बैलगाडा तसाच सरळ पुढे २०० ते २५० मीटरवर असणाऱ्या खोल विहिरीत जाऊन पडला. यात संग्राम नावाचा बैल मृत झाला. दुसरा बैल जखमी झाला होता.