Baramati News ! हेमंत गडकरी ! शेतमजूर, रंगारी, बिगारीचे काम करत तो बनला गावाचा सरपंच.....करंजेच्या युवकाचा थक्क करणारा प्रवास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
त्याचा जन्म वंचित समाजातील पिचलेल्या कुटुंबात झाला, घरी जेमतेम दीड एकर शेती, आईवडिल मोलमजुरी करायचे, गरिबीमुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्याने कधी दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली. कधी रंगारी तर कधी गावंड्याच्या हाताखाली बिगारी काम केले मात्र तोच युवक करंजे गावाचा कारभारी झाला आहे.
    ही कहाणी आहे बारामती तालुक्यातील करंजे गावच्या भाऊसो फुलाजी हुंबरे या तरुणाची. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊसो हुंबरे यांनी सरपंच पदाला गवसणी घातली. सुमारे १६५ मतांनी ते विजयी झाले आहेत. 
   घरची जेमतेम परिस्थिती असताना, कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हुंबरे यांनी यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी सरपंच पदासाठी बारामती तालुक्यात इतर गावात कोट्यवधी रुपये खर्च करणारे उमेदवार पराभूत झाले. मात्र हुंबरे  एक ही रुपया खर्च न करता निवडून आले आहेत. त्यांनी विरोधातील पाच उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त केल्या आहेत. 
     गावच्या विजन बाबतीत ते म्हणाले की सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन आदर्श गाव बनवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे. नियमीत कर भरणाऱ्या, माजी सैनिक, विधवा यांना करात सवलत देण्याचा प्रयत्न राहील. गावात अत्याधुनिक वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करणार. ढासळलेला शैक्षणिक दर्जा मिळवून देणे, सोलर ग्राम करणे, ही कामे तातडीने करून ग्रामस्थांना मोकळेपणे ग्रामपंचायतीत येता येण्यासारखे वातावरण निर्माण करण्यावर भर राहील असे ते म्हणाले.
      हुंबरे यांच्या सर्वसमावेशक व विनम्र स्वभावामुळे त्यांच्या विजयाने करंजे गावात उत्साहाचे वातावरण आहे.
-----------------------
हेल्पलाईन नंबर, क्यु आर कोड सुरू करणार
ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून कर भरण्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध करून देणार आहे. ग्रामसभा युट्युब लाईव्ह दाखवण्यात येणार असून समस्या निवारणासाठी हेल्पलाईन नंबर, इ प्रमाणपत्रे देणार असून ग्रामपंचायत कारभार हायटेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
To Top