सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती - हेमंत गडकरी
मराठा समाज व धनगर समाजाच्या आंदोलनांबरोबरच आता दुधाला वाढीव दर मिळावा, हमीभाव मिळावा, जनावरांना अल्पदरात विमा कवच मिळावे या मागणीसाठी बारामती तालुक्यातील तरडोली पाठोपाठ आता कोऱ्हाळे बुद्रुक गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक, कोऱ्हाळे खुर्द, थोपटेवाडी, लाटे, बजरंगवाडी, शिरष्णे, कुरणेवाडी, वडगाव निंबाळकर, मुढाळे, सायंबाची वाडी, लोणी भापकर, जळकेवाडी, महांगरेवाडी या गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हे साखळी उपोषण सुरू केले आहे.
दुधाला वाढीव दर मिळावा, हमी भाव मिळावा, भेसळीविरोधात पथके निर्माण करावीत, जनावरांना अल्प दरात विमा कवच मिळावे, पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुणवत्ता व किंमतीवर शासनाचे नियंत्रण असावे, जनावरांची औषधे, चारा, बियाणे मुबलक व त्यावर अनुदान मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्यात याव्या अशा मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सूर करण्यात आले असून यावर तोडगा न निघाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.