Baramati News ! वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या सुस्तावलेल्या पोलीस यंत्रणेला चोरट्यांचे आव्हान : घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. वारंवार चोरीच्या घटना घडुनही रात्रीच्या वेळी पोलिसांकडून गस्त बंद झाल्या आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या निम्म्या गावांचा कारभार  सुपे पोलीस ठाण्याला गेल्याने पोलिसांचा ताण कमी झाला आहे. मात्र ताण कमी होऊनही चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. चोरटे पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने चोरट्यांनी थेट वडगाव पोलिसांना आव्हान दिले आहे. सोमेश्वरनगर परीसरात चोरट्यांनी तीन दिवसात तब्बल ५० लाखांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. 
              एकीकडे चोरीच्या घटना घडत असताना नीरा -मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी गावच्या हद्दीत चोवीस तास पोलीस उभे राहत असून येणाऱ्या वाहनांची तपासणीच्या नावाखाली हप्ता घेत असल्याचे अनेक वाहन चालकांनी  सांगितले.
             वास्तविक पोलीस कोणत्या अधिकाराने वाहनांची तपासणी करतात हाही संशोधनाचा विषय आहे. विशेषतः होमगार्ड कडून वाहन चालकांना नाहक त्रास दिला जात आहे. एकीकडे वडगाव  पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असूनही त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नुकतीच मोढवे येथील प्रसिद्ध मरीमाता मंदीर व काही दिवसांपूर्वी  होळ येथील प्रसिद्ध  ढगाई देवी मंदिरात चोरी झाली होती.  याचाही तपास अद्याप पर्यंत लागला नाही. वाणेवाडी येथे साडेनऊ लाखाचा ऐवज चोरीला गेल्याची ताजी घटना असतानाच मंगळवारी रात्री मोढवे येथील प्रसिद्ध मरीमाता मंदिरात चोरट्यांनी तेरा लाख तीस हजार रुपयांची चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. दुसऱ्याच दिवशी करंजेपुल येथे घरफोडीच्या घटना घडल्या. गस्तीचे वाहन बंद असल्याने नागरिक भयभीत झाले असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या अगोदर मुरूम, वाणेवाडी, होळ व करंजेपुल येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. वारंवार चोरी होत असल्याने तरुणांनीच आता रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.  
       जुगार, मटका, गुटखा विक्री, हातभट्टी, तीनपानी चक्री जुगार, अवैध मुरूम वाहतूक सुरू असून पोलिसांकडून यावर डोळेझाक होत आहे.
याशिवाय परिसरात वारंवार होत असलेली भांडणे आणि ती मिटवण्यासाठी करंजेपूल पोलिस चौकीत तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांची होणारी गर्दीही परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक गुन्हे घडूनही त्यावर कारवाई करायची सोडून पोलिस आणि स्थानिक पदाधिकारी भांडणे मिटवण्यास पुढे येत आहेत. सोमेश्वर परीसरात गेल्या काही दिवसांपासून  बऱ्याचदा वादाचे प्रकार घडत आहेत. दोन्हीही गट आणि ग्रामस्थांमधील वाद मिटवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण केली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सोमेश्वरमध्ये सुरू आहे. 
वडगाव निंबाळकरचे पोलिस अधिकारी नेहमीच चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र त्यांनी केलेले काम कर्मचाऱ्यांच्या गैरकारभारामुळे अंगलट येत आहे. पोलिस कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  चांगुलपणाचा फायदा घेत अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहात आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याठिकाणी थेट लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. करंजेपुल पोलिस चौकीत अनेक टोळक्यांची विनाकारण उठबस होत असते ती का होते याबाबत स्थानिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक गुन्ह्यांची माहिती असूनही पोलीस ती देत नसल्याने तसेच गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
To Top