सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा : प्रतिनिधी
चालु वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी. आहे. चालू वर्षी पावसाळी हंगमापूर्वी दि. 1 जून 2023 रोजी धरणामध्ये एकूण 17.64 टी.एम.सी. पाणी साठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात 440 मि.मी. व पाणी आवाकमध्ये 39.71 टी.एम.सी. इतकी घट झाली आहे.दि. 1 जून ते 14 ऑक्टोंबर 2023 या दरम्यान सिंचन व वीज निर्मितीसाठी अनुक्रमे 5.46 टी.एम.सी. व 23.03 टी.एम.सी. वापर झाला आहे.
खरीप हंगाम सिंचन पाणी वापर---
कोयना धरणामधून सिंचनासाठी 42.70 टी.एम.सी. वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. त्यापैकी दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोंबर 2023 या खरीप हंगामामध्ये 4.39 टी.एम.सी. पाणीवापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. कोयना प्रकल्पांतर्गत सिंचीत होणारे बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातील असल्याने सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार सिंचनासाठी धरणामधून विसर्ग सोडण्यात येतो. मागील वर्षी कोयना धरणातून खरीप हंगामामध्ये झालेला पाणीवापर 0.47 टी.एम.सी. इतका मर्यादित होता. तथापी चालू वर्षी खरीप हंगामामधील ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये सांगली सिंचन विभागाकडून मागणी प्राप्त झाल्यामुळे कोयना धरणामधून 2.36 टी.एम.सी. इतके पाणी सोडण्यात आले आहे. गत वर्षी पेक्षा 2 टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे.
रब्बी व उन्हाळी हंगाम सिंचन पाणी वापर-----
धरणामधील उपलब्ध पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामामधील नियोजित पाणीवापरात 11.71 टी.एम.सी. प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात 2.86 टी.एम.सी. व वीज निर्मितीच्या पाणीवापरात 8.85 टी.एम.सी. पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार मुख्य अभियंता (ज.सं.), जलसंपदा विभाग, पुणे यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीज निर्मितीसाठी एकूण 70 टी.एम.सी. इतका मर्यादेत पाणीवापर करणेबाबात सूचित केले आहे.
रब्बी व उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे नियोजनाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यतेक्षाली दि. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे आयोजित बैठकीमध्ये कोयना धरणामधून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये सिंचन व वीज निर्मितीसाठी होणार पाणी वापर प्रत्येकी 35 टी.एम.सी.च्या मर्यादेत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे 25.45 टीएमसी व 12.41 टीएमसी असे एकूण 37.86 टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. तथापी उपरोक्त नमुद कपातीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामधील पाणी वापर 35 टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी 3 टीएमसी व सांगली जिल्ह्यासाठी 32 टीएमसी या मर्यादेत पाणीवापर करणे नियोजित आहे.
मागील वर्षी दि. 15 ऑक्टोंबर ते 22 नोव्हेंबर 2022 दरम्यान रब्बी हंगामामध्ये 1.42 टी.एम.सी. पाणीवापर झाला होता. दरम्यान उपरोक्त सिंचन नियोजनाच्या अनुषंगाने चालू वर्षी रब्बी हंगामामधील ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणामधून 2 टी.एम.सी. पाणी यापूर्वीच सोडण्यात आले आहे.
पुढील कालावधीमधील नियोजन-------
चालू वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे धरणामधील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरुन चालू वर्षी पिण्याच्या पाण्यासह सिंचन व विजनिर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल तसेच पुढील वर्षी जून व जुलै महिन्यात धरणामध्ये अपेक्षित पाणी आवक न झाल्यास पिण्यासह इतर आवश्यक गरजांसाठी धरणामध्ये किमान पाणीसाठा उपलब्ध राहील. त्यासाठी रब्बी हंगामामधील प्रत्यक्ष होणारा पाणी वापर व धरणामधील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करुन मार्च 2024 मध्ये उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे फेर नियोजन करण्यात येईल.