सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या चाळीसगाव खोऱ्यातील नाटंबी ता.भोर येथे सरपंच सदस्यांना एक महिना पूर्ण होण्याअगोदरच उपसरपंचपदाच्या निवडीवरून वाद होऊन ५ सदस्यांनी सदस्य पदाचे राजीनामे ग्रामसेवक यांच्याकडे दिले.या पार्श्वभूमीवर गावात तणाव वाढला असून तालुक्यात सर्वत्र या विषयाच्या चर्चेला उधाण आले आहे.
मागील महिन्यात नाटंबी ग्रामपंचायतची ६ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक झाली.सदर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल प्रकाश खोपडे सरपंचपदी निवडून आले.यात ७ पैकी ७ सदस्य राष्ट्रवादीचेच विजयी झाले होते. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विशाल खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यावेळी संगीता हनुमंत खोपडे यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, या निवडीवरून ७ पैकी ५ सदस्य नाराज झाले आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप धर्म खोपडे, अर्चना दत्तात्रय खोपडे, स्वप्नील आनंदा खोपडे, रूपाली राहुल खोपडे, अक्षदा विठ्ठल खोपडे यांनी ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.