Bhor News ! नगरपरिषदेचा अतिक्रमणावर हातोडा : बसस्थानक ते नगरपालिका चौकाने घेतला मोकळा श्वास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
भोर शहरातील महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर तसेच बाजारपेठेत अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत होती.अतिक्रमणामुळे पादुचारी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने चक्क तीन ते चार वर्षांनी गुरुवार दि.३० बसस्थानक ते नगरपालिका चौकापर्यंत अतिक्रमणावर हातोडा चालवीत अतिक्रमण हटविले.
              भोर नगरपरिषदेने एसटी बसस्थानक ते नगरपालिका चौक व राजवाडा तहसीलदार कार्यालय रस्त्यावरील दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी लोकांना अतिक्रमणाबाबत वारंवार लेखी,तोंडी नोटीसा बजावल्या होत्या.तसेच दोन आठवड्यापूर्वी नगरपालिका बाजारपेठ मुख्य रस्ता व राजवाडा , तहसीलदार कार्यालय रस्ता यावर पिवळा पट्टा रेषा अधोरेखित (लाईन आऊट)करून रस्ता हद्द कायम केली होती.या हद्दीतील असणारी अतिक्रमण बांधकामाबाबत लोकांना २४ तासाच्या आत अतिक्रमण बांधकामे हटवण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या.नोटीसधारकांनी कोणतीच हालचाल न करता अतिक्रमण विरोधी नोटीसबाबत टाळा टाळ केली होती.नगरपालिका प्रशासनाने अखेर कडक कारवाई करत बसस्थानक ,बाजारपेठ मुख्य रस्ता,राजवाडा चौक रस्त्यावरील अतिक्रमणांवर २ जे.सी.बी फिरवत पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर,अभिजित सोनवणे,पावन भागणे,महेंद्र बांदल आदींसह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
To Top