सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद, २७/ प्रतिनिधी
धनगर आरक्षणाचा लढा आता अधिकाधिक तीव्र होत असून शासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या खंडाळा तालुका बंदच्या हाकेला आज दि. २७ रोजी तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत लोणंदसह अनेक गावांत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश व्हावा यासाठी लोणंद येथे आंदोलन सुरू असून त्याअनुषंगाने पुकारण्यात आलेल्या खंडाळा बंदला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. लोणंद शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच बंद मधे सहभागी होत आपली दूकाने बंद ठेवली आहेत. यामुळे नेहमी गजबजलेली लोणंदची बाजारपेठ, बसस्थानक परिसर, लक्ष्मीरोड, जुनीपेठ, लोणंद सातारा रोड, शिरवळ रोड, खंडाळा रोड परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. लोणंदसह तालुक्यातील पाडेगाव, अंदोरी, बोरी, अहिरे, पाडळी, कोपर्डे, वाघोशी, खेड बु . निंबोडी, सुखेड, मोर्वे, शेडगेवाडी, बावकलवाडी, पिंपरे बु. बाळुपाटलाची वाडी, मरिआईची वाडी, कराडवाडी गावात शंभरटक्के बंद पाळण्यात आला , तर शिरवळ आणि खंडाळ्यातून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा म्हणून लोणंद नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाच्या बाराव्या दिवशी बोलताना गणेश केसकर यांनी बिहार, झारखंड व ओरिसातील उदाहरण देत जर त्या राज्यात दुरूस्ती होवू शकते तर महाराष्ट्रातून या राज्यात धनगड नसून धनगर अस्तित्वात आहेत अशी शिफारस केंद्राकडे का होवू शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच यापुढे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होणार असून धनगर समाजातील तरूण वर्ग मोठ्या संख्येत रस्यावर उतरू शकतो त्यासाठी सरकारच जबाबदार राहील असा इशारा देत सरकारने या गोष्टीचा विचार करून केंद्राकडे लवकरात लवकर शिफारस करावी अशी विनंती केली.
चौकट:
{ देशभरात वारंवार विविध कारणांनी पुकारण्यात येत असलेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर सामान्य जनता, शेतकरी वर्ग, व्यापारी आणि होटेल व्यवसायिक यांना होणारे नुकसान टाळता यावे यासाठी २०१८ साली लोणंद पोलिस ठाण्याचे तत्कालीन सपोनि गिरिश दिघावकर यांनी लोणंद बंद साठी एक अभिनव कल्पना मांडली. सकाळी काही तास बंद पाळून नंतर जनजीवन सुरळीतपणे चालू रहावे म्हणून अकरा वाजेपर्यंतच बंद करून नंतर तो शिथिल करण्यात यावा अशी शिफारस त्यांनी केली होती . त्याला लोणंदच्या जनतेने प्रतिसाद देत बंदच्या अनोख्या 'लोणंद पॅटर्नची' संकल्पना आजपर्यंत यशस्वीपणे राबविली होती. हाच पॅटर्न सुमारे पाच वर्षांत लोणंद बंद दरम्यान राबविण्यात आला होता. मात्र आजचा बंद या 'लोणंद पॅटर्न' ला अपवाद ठरला असून आज संपूर्ण दिवसभर लोणंदमधील व्यापाऱ्यांनी धनगर आरक्षणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुर्ण दिवसाचा बंद पाळला, याबद्दल लोणंद मधील समस्त धनगर समाजाकडून लोणंद मधील व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले
COMMENTS