Baramati News ! मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महात्मा फुले इतिहास अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद समिती सदस्य आणि मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
           प्राचार्य डॉ. वायदंडे हे बावीस वर्षापासून काकडे महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या उच्चशिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. वायदंडे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे विशेष मोलाचे कार्य आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, आधीसभा, परीक्षा मूल्यमापन मंडळ यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांचे सदस्य असून अनेक महाविद्यालय आणि परिसंस्थांच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य आहेत. आदर्श शिक्षक, बाबूजी जगजीवनराम राष्ट्रीय सन्मान पदक (नवी दिल्ली), तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड २०२०’ तसेच ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ही त्यांना याचवर्षी प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्र आणि परिसंवादात त्यांनी सहभागी होऊन आपले संशोधन पेपर सादर केले आहेत. एकूण ३८ संशोधन पेपर, ७ संदर्भ ग्रंथाचे लेखन डॉ. वायदंडे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य म्हणून देखील काम पाहिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी शिक्षण संचालक श्री.डी. सी. देशमुख, शिक्षण संचालक सुमन शिंदे,  डॉ. श्रीमंत कोकाटे, उद्योगपती श्री. गणेश भरेकर, सरहद्द संस्थेचे संस्थापक श्री. संजय नहार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
To Top