सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत तरडोली येथील विद्यमान सरपंच विद्या हनुमंत भापकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावर आज बारामती तहसिलदार गणेश शिंदे यांनी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अविश्वास ठरावाच्या बाजूने नऊपैकी सात सदस्यांनी मतदान केल्याने बारामती तहसीलदार यांनी विद्या भापकर यांचे सरपंच पद रद्दबातल ठरविले आहे.
तरडोली येथील ग्रामपंचायत सदस्य महेंद्र जिजाबा तांबे व इतर सहा सदस्यांनी स्वतंत्र फळी निर्माण करून बारामती तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, निधीचा गैरवापर, मनमानी पद्धतीचे कामकाज चालविणे व पतीचा कामकाजात हस्तक्षेप यांसारखे गंभीर आरोप या ७ सदस्यांनी ठेवले होते.यानुसार तहसीलदार गणेश शिंदे यांनी आज दि. १५ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते यानुसार सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावली होती.
यानुसार आज झालेल्या विशेष सभेमध्ये भापकर यांच्या विरोधात महिंद्र जिजाबा तांबे, नवनाथ जयसिंग जगदाळे, अश्विनी श्रीकांत गाडे, स्वाती सतीश गाडे, सागर पंडित जाधव, अनिता उत्तम पवार, नबाबाई सोमनाथ धायगुडे यांनी मतदान केले तर त्यांच्या बाजूने संतोष संपत चौधरी यांनी मतदान केले .एकूण नऊ सदस्यांपैकी सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने ठराव दोन तृतीयांशने संमत झाला. अविश्वास ठराव पारीत झाल्यानंतर बोलताना सरपंच भापकर यांनी सांगितले की, केलेले आरोप हे केवळ राजकीय सुडबुद्धीने केले असून सरपंच पदाच्या हव्यासापोटी हा अविश्वास ठराव आणला आहे. याविरोधात मी वरीष्ठ पातळीवर न्याय मागणार आहे.
COMMENTS